वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील नागरिकांनी सोमवारी हेस्कॉम विरोधात 33 केव्ही सबस्टेशनच्या उच्चदाबाची विद्युत वाहिनी घालण्यासंर्भात चालू केलेल्या कामाला आक्षेप घेत काम बंद पाडून निवेदन दिले होते. याची दखल संबंधित अधिकारी वर्गाने घेऊन मार्ग बदलण्याचा व नागरिकांच्या म्हणण्यानुसार विद्युत वाहिनी घालण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे.
या संदर्भात सुळगा ग्राम पंचायतीमध्ये हेस्कॉमच्या 33 केव्ही विभागाचे अधिकारी अशोक सुर्यवंशी उचगाव विभाग सेक्शन अधिकारी मुंझे यांनी सुळगा ग्रामस्थ व ग्राम पंचायत पीडीओ पूनम गडद तसेच माजी ग्रा. पं. सदस्य भागाण्णा नरोटे, यल्लाप्पा कलखांबकर, गायत्री तुप्पट, विमल पाटील, सिद्धव्वा कांबळे यांच्याशी चर्चा केली. योवळी अशोक सुर्यवंशी म्हणाले, ग्रामस्थांच्या जीविताला कोणताही धोका न पोहचवता गावाबाहेरून सदर विद्युत वाहिनी घालण्यात येईल. निर्णय घेईपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल, असे लेखी देऊन या कामाची पाहणी करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.









