रूग्णवाहिका उपलब्धेतही ‘एजंट’गिरी, फेरीमागे उकळताहेत दहा हजार रूपये, कर्मचारीच सहभागी असल्याची प्रताप शिंदेंची प्रशासनाकडे तक्रार
प्रतिनिधी / चिपळूण
कोविड रूग्णांची उपचाराच्या नावाखाली खासगी रूग्णालयांत अक्षरशः लूट चालली असल्याच्या तक्रार येत असतानाच आता रूग्णवाहिकाधारकांकडूनही लूटमार सुरू आहे. त्यामध्ये कर्मचारीच एजंटगिरी करत असल्याची तक्रार शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी केली आहे. चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी कार्डीयाक रूग्णवाहिकेसाठी रूग्णाच्या नातेवाईकाकडून तब्बल 35 हजार रूपये घेण्यात आले असून त्यातील दहा हजार रूपये एजंटगिरी करणाऱया कर्मचाऱयाला देण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोविड रूग्णांकडून उपचाराच्या खर्चाची बिले अवास्तव येत असल्याची बाब तालुकाप्रमुख शिंदे यांनी सर्वप्रथम लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयाच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर रूग्णालयात उपचार बिलांची तपासणी करण्यासाठी दोन अधिकाऱयांची नियुक्तीही जिल्हाधिकाऱयांकडून करण्यात आली. सदर अधिकारी रूग्णालयात जाऊन तपासणी करत असतानाच बुधवारी रूग्णवाहिकेच्या अवास्तव भाडेसंदर्भात तक्रार पुढे आली आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळी शिंदे यांनी कामथे रूग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप, तसेच निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी चर्चा करत रूग्णवाहिकेंसदर्भात आलेल्या तक्रारीवर चर्चा केली.
यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूवीं कामथे रूग्णालयातून एका रूग्णाला मुंबईला हलवायचे होते. त्यासाठी काडीर्याक रूग्णवाहिकेची गरज होती. मात्र तत्काळ मिळत नव्हती. शेवटी एका कर्मचाऱयानेच रूग्णवाहिका मिळवून दिली. त्यावर चालकही त्यानेच मिळवून दिला. मात्र मुंबईला गेल्यावर रूग्णाच्या नातेवाईकडून चालकाने तब्बल 35 हजार रूपये घेतले. यासंदर्भात आपण रूग्णवाहिकेच्या मालकाला विचारणा केली असता आपणाला 25 हजार रूपये भाडे मिळाल्याचे कबूल करताना उर्वरित दहा हजार रूपये एजंटगिरी करणाऱया कर्मचाऱयाने घेतल्याचे स्पष्ट केले.
मुळातच सध्या रूग्ण वाढत आहेत. रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या उपलब्ध करून देण्यासाठी काही एजटंही निर्माण होत आहेत. अगदी कराडला जाण्यासाठीसुध्दा दहा हजार रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात रूग्णालयांप्रमाणेच रूग्णवाहिकांचे दर जाहीर करावेत आणि अशा प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आपण बुधवारी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडेही केली आहे.