ऑनलाईन टीम / मुंबई :
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढले. सगळ्या सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केले. आपल्या मनातील भावना त्यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झाले. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, माझी अपेक्षा अशी आहे की उपासभापतींनी सदस्यांना मत मांडायची संधी द्यायला हवी होती. मी महाराष्ट्रात आणि संसदेत काम केले पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून असे वर्तन कधी पाहिले नव्हते. माननीय उपासभापती हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत, परंतु विचारांना तिलांजली देण्याचे काम सभागृहात झाले. उपसभापतींची भूमिका सभागृहाच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन करणारी आहे, अशा शब्दात शरद पवारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर टीका केली.









