प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात फ्लेक्सचे जाहिरात फलक लावण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. यामुळे महापालिकेने फलक लावण्यास परवानगी देण्याचे बंद केले आहे. पण शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर काहींना जाहिरात फलक लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण जाहिरात फलकांचे शुल्क जानेवारीपासून महापालिकेकडे जमा केले नसल्याने गोवावेस परिसरातील दुभाजकांवरील फलक हटविण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली.
प्लास्टिक बंदी कारवाईअंतर्गत फ्लेक्सचे फलक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जाहिरात शुल्क आकारण्याच्या निविदेची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद लाभला नाही. तरीही शहरातील विविध ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचा आदेश प्रशासक अंमलान बिस्वास यांनी बजावला होता. त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली होती. पण काही दिवसांनंतर ही कारवाई थांबली आहे. यामुळे ठिकठिकाणी अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. रस्त्यांवरील दुभाजकांवर जाहिरात फलक लावण्यात आले आहे. बसवेश्वर चौक ते डाक बंगलापर्यंतच्या महापालिका क्यापारी संकुलासमोरील गोवावेस रोडच्या दुभाजकावर 30 जाहिरात फलफ लावण्यात आले होते. सदर कंत्राटदाराने जानेवारीपासून महापालिकेचे शुल्क भरले नसल्याने जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्याचा आदेश बजावला होता. त्यामुळे सोमवारी सदर कारवाई करून दुभाजकावर लावण्यात आलेले जाहिरात फलक हटविण्यात आले. यावेळी मनपाचे महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱयांनी ही मोहीम विविध ठिकाणी राबविली. महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.