माणसाचे मन अस्वस्थ असेल तर त्याची स्थिती फारच चंचल होऊन जाते. समर्थ रामदासस्वामी अशा अवस्थेवर आपल्या मनाच्या श्लोकातून मार्ग दाखवितात. पण, तेथवर पोहोचण्यापूर्वी अनेकांची अवस्था ही, ‘कळेना कळेना कळेना ढळेना, ढळे ना ढळे संशयोही ढळेना, बळ आकळेना मिळेना मिळेना’ अशी होऊन जाते. आपल्याला नेमके काय शोधायचे आहे याचा गोंधळ होऊन, ‘अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हीत ते आकळेना, परीक्षेविणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे?’ असा गोंधळ माजून राहतो. रामदासस्वामींचे असे अधिकमासी स्मरण होण्याचे कारण आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिलबाबू देशमुख! त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना महाराष्ट्रात काही पोलीस अधिकारी मिळून ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट केल्याच्या वृत्ताने गेले दोन दिवस एकच संशयकल्लोळ माजला आहे आणि आपल्या तोंडी ही वाक्मये घातल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. अर्थात अशा प्रकारचा प्रयत्न हा शंभर टक्के झालेला होता आणि काही पोलिस अधिकाऱयांनी फडणवीस यांच्यासाठी काही आमदारांवर तुमच्या फाइल्स आमच्याकडे आहेत असे सांगून दबाव आणला होता ही राजकीय वर्तुळातील गुप्तपणे चाललेली चर्चा या निमित्ताने उघड झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात ही चर्चा होतीच. पण, ठाकरे सरकार सत्तेवर आले आणि असा प्रयत्न करणाऱया मंडळींचे दुखणे बळावले. त्यांनी तत्काळ केंद्र सरकारमध्ये नोकरीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. पण काही कारणाने ही नियुक्ती थांबली. दरम्यान विरोधी पक्षातील भाजपलाही सत्ता आज उलथेल, उद्या उलथेल असे सांगता सांगता दमछाक होऊ लागली. त्यांच्या मनाचीही, ‘फुटे ना, तुटे ना, चळे ना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, तया एक रूपासी दुजे न साहे…’ अशी स्थिती झाली. त्यांनी सत्ता खेचण्यात आम्हाला रस नाही असे सांगत रोज एक नवी खेळी मांडून ठेवायची पद्धत अवलंबली. अर्थात या सर्वच वृत्ताला साक्षात ‘सामना’तील संपादकीयाद्वारे दुजोरा मिळालेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एका अति वरि÷ अधिकाऱयाना राहिलेली अडीच वर्षांची सेवा महाराष्ट्राऐवजी केंद्रात जाऊन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी अधिकाऱयांच्या बदल्यांच्या फाईलवर सही न करता रजेवर जाण्याची तयारी त्यांनी दाखवली होती म्हणे. याबद्दल बराच संतापही आहे. पण गृहमंत्र्यांना काही झाले तरी आपल्या खात्याच्या अधिकाऱयांना सावरून घ्यावेच लागते. त्या पद्धतीने त्यांना सावरता सावरता अनिलबाबू पोलीस अधिकाऱयांच्या सरकार विरोधी कारवाईचे एक सत्य अप्रत्यक्षरित्या सांगून गेले. सरकारच्या विरोधात इतके करून आपले काय बिघडले अशी या अधिकाऱयांची भावना आहे अशी खदखद ‘सामना’ने व्यक्त केली. सरकार मधल्या घटकांची अवस्था, रामदासांनी व्यक्त केल्याप्रमाणे, ‘हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधूनी पाहे, हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी’ अशी झाली. गेल्या वषी याच महिन्यात फडणवीस यांची सत्ता जाईल असे कोणीही म्हणू शकले नसते. तिथे बिचारे अधिकारी पुढची सत्ता येत असतानासुद्धा जुन्या सत्ताधाऱयांसाठी राबले असतील तर ती त्यांची स्वामीभक्ती आहे. सत्तेवर येऊन नोव्हेंबरमध्ये एक वर्ष होणाऱया आघाडी सरकारला जर गेल्या वर्षभरात आपल्या वरि÷ अधिकाऱयांच्या मनामध्ये सरकारबद्दल आपुलकी निर्माण करता आली नसेल तर तो दोष कोणाचा? सरकारची मुदत पाच वर्षे असते. त्यातील एक वर्ष गेले तरी आजची अवस्था, ‘जनी सांगता-ऐकता जन्म गेला, तरी वाद-वेवाद तैसाची ठेला, उठे संशयो वाद हा दंभ धारी, उठे वाद संवाद तो हीतकारी’ असे झाले आहे का, हे तपासण्याची वेळ सरकारवरच आलेली आहे, असे खुशाल समजले पाहिजे. सरकार चालवणाऱया व्यक्तींना मन मोठे करावे लागते, काही गुन्हे नजरेआड करावे लागतात आणि आपल्या मुख्य कामाला गती देऊन आपला प्रभाव समोरच्यांवर वाढवावा लागतो. ‘गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत होवोनी राहे’ असे रामदासस्वामी सुचवितात. अर्थात स्वामींना सुचवायला काय जाते? इथे पाच वर्षे सरकार टिकवायला एक एक अख्खी जल योजना नैवेद्य म्हणून खायला द्यावी लागते असे वास्तव असताना ते, ‘नसे गर्व अंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभ, क्षोभ ना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणिजे योगीराणा’ अशी लक्षणे सांगतात. आता हे ऐकायचे कोणी असा प्रश्न पडतो. पण तीन पक्षांच्या सरकारचे जे चित्र प्रतीक आहेत ते प्रबोधनकार ठाकरे स्वतः मनाचे श्लोकातून कोदंडाचा टणत्कार आणि घाव घाली निशाणी या शब्दांचा उपयोग करतात. मग सरकारला रामदासस्वामींचे हे शब्द प्रमाण मानून, ‘समस्तां मध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वाऊगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा….’ असे का वाटत नाही? राम हे एक आदर्श राज्यकर्त्याचे प्रतीक! नोकरशाही ही बिरबलासारखी असते. राजाला वांगे आवडले तर वांग्याचा देठ म्हणजे त्यांना मुकुट भासतो आणि वांगे नावडते झाले तर त्याच देठावरील काटे त्यांना गलिच्छ वाटू लागतात… कारण नोकरदार राजाचे गुलाम असतात, वांग्याचे नाही! राज्यकर्त्यांनी नोकरदारांचा बाऊ करावा, की त्यांना आपल्या दंडनीतीचा बाऊ दाखवावा हे शेवटी राज्यकर्त्यांवर आहे. ते जितके सक्षम तेवढी नोकरशाही लीन याचा विसर पडू देऊ नये. सरकार हे श्लोक मनावर घेईल अशी अपेक्षा!
Previous Articleफसलेल्या पाककृती
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात 70 कोरोना पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








