सावळज / वार्ताहर
तासगांव तालुक्यातील पुर्व भागाला वरदान ठरणारा अंजनी तलाव आज दि. २० रोजी तुडुंब भरला आहे. तासगाव तालुक्यातील पाणी साठवण क्षमतेत तिसऱ्या क्रमांकाचा ७४.१५ द.ल.घ.फु. क्षमतेचा अंजनी तलाव सलग दुसऱ्या वर्षी ओसंडून वाहु लागला आहे. या तलावावर सावळजसह अंजनी, डोंगरसोनी व वडगाव या चार गावाच्या नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या चार गावाच्या पिण्याच्या तसेच परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिक व शेतकरी सुखावले आहेत.
हा तलाव म्हैसाळ पाणी योजनेच्या पाण्याने व पावसाच्या पाण्याने अडीच महिन्यात ७५ टक्केनी पाणीसाठ्यात वाढ होऊन आज रविवारी सकाळी पुर्ण क्षमतेने भरून तलाव वाहु लागला आहे. गतवर्षी २५ ऑक्टोबरला हा अंजनी तलाव भरला होता.