दिवसात 977 जणांना बाधा, 21 जणांचा बळी तर809 कोरोना मुक्त
कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ
सातारा पोलिसांच्या चैतन्य हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज
कोपर्डेतील ती ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत
अपशिंगे मिल्ट्री गावाने घेतला दहा दिवस जनता कर्फ्युचा निर्णय
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची मगरमिठी कोणाला सुटली नाही. गेल्या दहा दिवसांत साडे नऊ हजार रुग्ण वाढले आहेत. 7 हजार 606 जण मुक्त झाले. तपासणी 9,947 बळी 2,71 उपचार घेत असलेले 708 वाढले आहेत. जिल्ह्यात 20 हजाराच्या समीप कोरोना मुक्तीचा आकडा पोहचला आहे. सातारा पोलिसांच्या चैतन्य हॉस्पिटलमधून पाच दिवसात दोन जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर दिवसभरात 21 बळी गेले असून रात्रीच्या अहवालात 977बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्हा 30 हजारावर पोहचला आहे. दोन दिवसापूर्वी गाजलेली कोपर्डे (ता. खंडाळा) येथील ती ऑडिओ क्लिप थेट मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पोहचली आहे. त्यामुळे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
लक्षणे नसणारेही अडवताहेत बेड
एका बाजूला प्रशासन कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी झटत आहे. दररोज 900 च्या पटीत बाधित होत आहेत तर कोरोनामुक्त ही त्याच पटीत वाढत आहेत. असे असताना गाव पातळीवर कोरोनाचे राजकारण रंगू लागले आहे. नियम गावचा अन बाधितांचे हाल असे चित्र गावोगावी आहे. अनेक बधिताना तर लक्षणे नाहीत तेच जिल्ह्यातील रुग्णालयात बेड अडवून आहेत. ते गावच्या नियमामुळे तर काही रुग्ण वेदनेने तडफडत घरातच अंथरूण पकडून आहेत. त्यांना बेडची गरज असूनही बेड मिळत नाही. होमआयसोलेशनचा सल्ला दिला जात आहे.
होम आयसोलेशनमध्ये रुग्णांकडे पैसा असेल तर तो चांगला उपचार घेत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा जे किट देते त्यात टेमरेचर गन, ऑक्सिमीटर, मास्क, सनिटायझरच्या बाटल्या, मास्क व हात मॊजे, माहिती पुस्तक आहे. मात्र हे किती रुग्णापर्यंत पोहचतात, त्याची ही खंत बाधित रुग्ण व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर होम आयसोलेशनमधील रुग्णांना डॉक्टर, नर्स यांनी सेवा दिली तर मृत्युदर घटेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसेच रेडसेमवीर या इंजेक्शनच्या ब्लॅकने विक्री होत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात आहेत. त्याच अनुषंगाने कोपर्डे (ता. खंडाळा)येथील एका पक्षाचा कार्यकर्ता आणि डॉक्टर यांच्यातली ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. त्या क्लिपची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार झाली आहे. आता तर ती क्लिप मुख्यमंत्री कार्यालयात पोहचली आहे. त्यावर कारवाई होणार की त्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातील नेते मंडळी वाचवणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पत्रकार संतोष गुरव यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा शोकसभेत पत्रकारांचा निर्धार
कोविड 19 मुळे छातीत इन्फेक्शन होऊन कराड तालुक्यातील काले गावचे पत्रकार संतोष मच्छिंद्र गुरव (वय 30) यांचा मृत्यू झाला आहे. गुरव यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शासकीय पातळीवर कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांसाठी असणाऱया योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय कराड शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकारांच्या शोकसभेत घेण्यात आला.यावेळी पत्रकार संतोष गुरव, पत्रकार पांडुरंग रायकर, पत्रकार माऊली श्रीमती कलावती सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पशिंगे मिल्ट्रीमध्ये दहा दिवस जनता कर्फ्यू
वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्णांना गावात ब्रेक लावण्यासाठी सैनिकांचे असलेल्या अपशिंगे मिल्ट्री या गावात कोरोना दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत गावात ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.दि.21ते 30 या दरम्यान हा कर्फ्यु असणार आहे.तसे पत्र बोरगाव पोलिसांना दिले आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आजपासून प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ करण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय असून, या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
21 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या मर्ढे सातारा येथील 52 वषी्रय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय महिला, नागपूर येथील 37 वर्षीय पुरुष, लिंब ता.सातारा येथील 70 वर्षीय महिला, हरपळवाडी ता. कराड येथील 54 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, उरुळ ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये सुर्यनगरी, बारामती येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय महिला, ताटवडा ता. फलटण येथील 41 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 73 वर्षीय पुरुष, भाटवडे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील घोरपडे कॉलनी सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कोरेगाव येथील 36 वर्षीय महिला, कटापूर येथील 90 वर्षीय पुरुष अशा एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
809 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 921 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 809 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 921 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
921 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, उपजिल्हा रुग्णालय कराड 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण 51, कोरेगाव 22, वाई 138, खंडाळा 77, रायगांव 141, पानमळेवाडी 102, मायणी 65, महाबळेश्वर 40, दहिवडी 42, खावली 23, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 189 असे एकूण 921 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात शनिवारी
बाधित 977
मुक्त 809
मृत 21
जिल्हय़ात शनिवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने – 62579
एकूण बाधित — 30092
घरी सोडण्यात आलेले — 19866
मृत्यू — 828
उपचारार्थ रुग्ण – 9398