पतीनेच मारेकऱ्यांना दिली २५ हजारांची सुपारी
कागल / प्रतिनिधी
कागल तालुक्यातील गोरंबे येथील बेपत्ता महिलेच्या खूनाचे गुढ उकलण्यात कागल पोलीसांना यश आले आहे. मोबाईल सिडीआर वरून पोलीस आरोपीपर्यत पोहचले. याप्रकरणी पोलीसांनी मृत महिलेच्या पतीसह निपाणीतील तीघा संशयीत आरोपींना अटक केली आहे. त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी गोरंबे येथील गीता सागर शिरगांवकर या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती सागर याने ३० जूलै रोजी कागल पोलीसात दिली होती. पोलीसांनी गीताचा शोध घेऊनही त्या मिळून आल्या नव्हत्या. त्यामुळे पोलीसांनी सागर शिरगांवकर यांच्यावर संशय व्यक्त करत तपास सुरू ठेवला होता. सागर याच्या मोबाईलवरील कॉल तपासून पाहिले असता निपाणीतील काही युवकाशी संभाषण झाल्याचे उघड झाले. तसेच गीताचा मोबाईलही निपाणीतील आरोपीकडे असल्याचे आढळून आले. तपास अधिकारी आणि कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी यांनी निपाणीतील संशयीत आरोपिना चौकशीकरीता ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलीशी खाक्या दाखवत चौकशी केली असता गीताचा खून केल्याचे त्यांनी कबुल केले.
पोलीसांनी गीताचा पती सागर याला ताब्यात घेऊन गीताविषयी चौकशी केली असता सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी निपाणीतील संशयित आरोपींना सागर समोर उभे केले. पोलिसांनी खूनाचा उलगडा केल्याचे लक्षात येताच आपण या तिघांच्या मदतीने गीताचा खून करुन तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याचे कबूल केले . गीताचे सागरवर प्रेम होते. १८ वर्षाच्या संसाराला तिलांजली देऊन तीने विवाहीत सागर बरोबर संसार थाटला होता. मी तुझ्यासाठी पती व मुलांना सोडून आलोय तूही तुझ्या बायको – पोरांना सोड आपण स्वतंत्रपणे राहूया. असा तगादा गीताने सागरकडे लावला होता. या भांडणाला कंटाळलेल्या सागरने गीताचा काटा काढण्याचे ठरवले .
कागल तालूक्यातील नंद्याळ येथील राहुल कुरणे यांच्या मध्यस्थीच्या सहाय्याने सागरने निपाणीतील प्रशांत मोरे, गणेश जासूद आणि आकाश पसारे यांना गीताच्या खूनाची २५ हजार रुपयांची सुपारी दिली. २८ जूलै रोजी आपण शेताकडे चाललो आहोत असे घरात सांगून सागर शेताकडे गेला . त्यापूर्वी त्याने गिताला आपण स्वतंत्र रहायचे आहे. तयार होवून रात्री साडेबारा वाजता बाहेर पड मी तुला न्यायला येतो असे सांगितले . त्याप्रमाणे रात्री साडेबारा वाजता सागर गीताला घेऊन निपाणीतील बवेश्वर चौकातील तंबाखू वखारीजवळ गेला.
याठिकाणी आधीच थांबलेल्या आरोपींनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गिताच्या डोक्यात रॉड घालून तिला ठार केले आणि मृतदेह शहा यांच्या ऊसाच्या शेतात टाकला. तब्बल दीड महिन्यापर्यंत घटनेची खबर पोलीसासह कोणालाही लागली नव्हती. गीताच्या फोनमुळे पोलीस आरोपीपर्यत पोहचले. या प्रकरणी सागर शिरगांवकर याच्यासह निपाणीतील तिघा संशयीताना अटक केली आहे . सर्वाना न्यायालयात हजर केले असता २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .नंद्याळ येथील मध्यस्त राहुल कुरणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
Previous Articleनदीकाठावरील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण
Next Article नियम पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल









