कोल्हापूरच्या पोलीस दलातील लोकप्रिय अधिकाऱयांची परंपरा आपल्या कामगिरीने पाडली होती करवीरकांवर छाप
कोल्हापूर / संजीव खाडे
1988-89 चा तो काळ. कोल्हापूर शहरासह जिल्हय़ात अवैध व्यवसाय करणाऱयांची सिंडिकेट जोरात होती. त्या काळात आयपीएस शिवप्रतापसिंह यादव यांची कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पोष्टींग झाली. कोल्हापूरला येण्याआधीच त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवैध व्यवसाय करणाऱयांना सूचक इशारा देताना ‘उखाड देंगे’ असे विधान केले. त्यांच्या त्या विधानाचा असा परिणाम झाला की, यादव साहेब कोल्हापुरात येण्याआधीच मटका, जुगाराचे क्लब कोणत्याही कारवाईविना बंद झाले. गुन्हेगार, त्यांच्या टोळय़ा परागंदा झाल्या.
तीस बत्तीस वर्षांपूर्वीच्या या आठवणीला पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या बदलीनंतर पुन्हा उजाळा मिळाला. डॉ. देशमुख यांनी गेल्या तीन साडेतीन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात गुन्हेगारी मोडून काढली. अवैध व्यवसायिक, मटकावाले, खासगी सावकर, गुन्हेगारी टोळय़ांना मोका लावण्याचे धाडस केले. सामान्य नागरिकांना दिलासा दिला. कोरोनाविरोधातील लढय़ातही आपल्या पोलीस दलाच्या साथीने योगदान दिले. एमबीबीएस असणाऱया डॉक्टर देशमुख यांनी आपल्या पोलीस दलातील चुकीचे काम करणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांचेही व्यवस्थित ऑपरेशन करत वचक निर्माण केला. त्यातून डॉ. देशमुख यांची कोल्हापूरकरांमध्ये क्रेझ निर्माण झाली.
त्यांच्या प्रमाणे गेल्या तीस वर्षांत काही आयपीएस अधिकाऱयांनी कोल्हापूर गाजवले होते, ते आपल्या चांगल्या कामामुळे. सर्वात गाजले होते ते शिवप्रतापसिंह यादव. कोल्हापूरची गुन्हेगारी, अवैध व्यवसाय करणाऱयांची सिंडिकेट त्यांनी मोडून काढली होती. 1990 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पेठेतील एका प्रभागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 23 पैकी 21 उमेदवारांनी माघार घेतली. भिकशेट पाटील आणि शिवाजीराव चव्हाण रिंगणात राहिले. पाटील यांच्यावर माघारीसाठी दबाव होता. पण ते नमले नाहीत. त्याचवेळी शिवप्रतापसिंह यादव यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन पाटील यांना पोलीस संरक्षण दिले. माघार घेतलेले उमेदवार लालासाहेब गायकवाड यांच्याकडे चौकशी करून दिलासा दिला. पाटील निवडून आले, पुढे महापौर झाले. त्यावेळी यादव यांच्या कार्यशैलीची कोल्हापुरात चर्चा झाली होती. कोल्हापुरात सिमा परिषद झाली होती. त्यावेळी आयपीएस मिरा बोरवणकर यांच्या रूपाने पहिल्यांदा कोल्हापूरला महिला पोलीस अधिकारी लाभली.
बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मिरा बोरवणकर यांनी अवैध व्यावसायिकांना दणका देताना राजारामपुरीतील एका बडय़ा गुंडाची धिंड काढली होती. नव्वदच्या दशकातच के. एस. विष्णोई यांच्यासारखा कडक अधिकारी लाभला. मुंबईचे पोलीस आयुक्त झालेले आणि 26-11 च्या हल्ल्यानंतर चर्चेत आलेले आयपीएस राकेश मारिया यांची कारकीर्द कोल्हापुरातून सुरू झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहिलेल्या के. एस. प्रसाद यांचीही एकेकाळी स्थानिक गुन्हेगारांनी धास्ती घेतली होती. उल्हास जोशी, आर. के. पद्मनाभन, भगवंतराव मोरे, सुखविंदर सिंग या बडय़ा अधिकाऱयांनीही दरारा निर्माण केला होता.
संजयकुमार यांच्यासारखा कडक आणि अत्यंत साधा पोलीस अधीक्षकही कोल्हापूरकरांनी अनुभवला. त्यांनी कडक शिस्तीने गुन्हेगारी मोडून काढली. संजयकुमार पुढे महाराष्ट्र एटीसएसचे प्रमुख झाले. पानसरे खुनाच्या तपासाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. थेट सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट असणारा आणि शांतपणे गुन्हेगारी नियंत्रित करणारा पोलीस अधीक्षक म्हणून आयपीएस डॉ. मनोजकुमार शर्मा कोल्हापूरकरांमध्ये लोकप्रिय ठरले हेते. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी आपला वचक निर्माण केला होता. फुटबॉल, बास्केटबॉल आणि पॉवरलिफ्टिंगचे खेळाडू असणाऱया कामटे यांनी पोलीस दलाला देखील व्यायाम करायला लावला होता. त्यांचे व्यक्तीमत्व कोल्हापूरकरांमध्ये आकर्षणाचा विषय ठरले होते. लोकप्रिय पोलीस अधिकाऱयांच्या मांदियाळीत पोलीस अधीक्षक यशस्वी यादव आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग हे बडे अधिकारी काहीसे वादग्रस्त ठरले होते.
डॅशिंग अधिकारी मोहन राठोड
1980 ते 85 च्या दरम्यानच्या काळात कोल्हापूर शहरचे डीवायएसपी असणाऱया मोहन राठोड यांनी आपल्या डॅशिंग स्टाईलने शहरातील जुगार अड्डे, क्लब उद्धवस्त केले होते. हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते आणि राठोड यांच्यात आंदोलनावरून झालेला संघर्षही कोल्हापुरातील त्यावेळच्या पिढीने अनुभवला होता.