शहरातील एका नामवंत हॉस्पीटलमधील प्रकार
राजेंद्र होळकर/ कोल्हापूर
गेल्या महिन्यात एका मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिणे चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या चोरीचा छडा लागण्यापूर्वीच शहरातील महाराणा चौकातील एका नामवंत कोविड 19 हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या कोल्हापुरातील कदमवाडीमधील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्या अंगावरील सुमारे 2 लाख 59 हजार रुपये किंमतीच्या सात तोळ्याचे सोन्याचे दागिण्यावर चोरटय़ाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या चोरीची लक्ष्मीपूरी पोलिसात नोंद झाली आहे.
कदमवाडी येथील ऍपल सरस्वती हॉस्पिटल लगतच्या सहजीवन परिसरातील साई सिध्दी अपार्टमेंटमधील एका महिलेला गेल्या काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला शहरातील महाराणा चौकात असलेल्या नामवंत कोविड 19 रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. याच दरम्यान तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला याच रुग्णालयामधील आयसीयु विभागात दाखल केले. याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु असताना तिच्या अंगावरील चार तोळ्याच्या हातातील पाटल्या, दोन तोळ्याचे मंगळसुत्र, आठ ग्रॅम वजानाच्या कानातील फुले, दोन ग्रॅम वजानाच्या कानातील बुगडय़ा असा सात तोळ्याचे दागिणे चोरीस गेले. हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आला असून, याविषयी या कोरोनापॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईकांनी लक्ष्मीपूरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
शहरातील रुग्णालयामधून उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिणे चोरीस जावू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच यापूर्वी सीपीआर रुग्णालयामधून रुग्णाच्या नातेवाईकांचे किंमती मोबाईल चोरी गेले आहेत. अशा या हॉस्पीटलमधील चोरीच्या घटनाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून, अशा चोऱ्या करणाऱ्या चोरटय़ांचा शोध घेवून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांच्यातून केली जात आहे. तर महाराणा चौकातील नामवंत कोव्हिड 19 हॉस्पिटलच्या आयसीयुमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंगावरील सोन्याचे दागिणे चोरी गेलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेवून हॉस्पिटल आणि त्यांच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.









