वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाव्हायरसमुळे वाढणाऱया रुग्णांच्या संख्येने देशाच्या आर्थिक व्यवहारांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम केला आहे. वाहतुकीवरदेखील मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळेच गेल्या ऑगस्टमध्ये शुद्ध इंधनाची मागणी कमी राहिली आहे.
एप्रिलनंतरची ही सर्वात कमी तेलाची मागणी ऑगस्टमध्ये राहिली असल्याचे सांगण्यात येते. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलपासून ते आतापर्यंतच्या कालावधीत सर्वात कमी विक्री ऑगस्टमध्ये दिसून आली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल यांच्या माहितीनुसार ऑगस्ट 2020 मध्ये 14.39 दशलक्ष टन इतक्मया शुद्ध तेलाची विक्री झाली आहे. ही विक्री मागच्या वषीच्या तुलनेमध्ये 16 टक्के इतकी कमी आहे. वर्षागणिक विक्रीचा आढावा घेतल्यास सलग सहाव्या वषी मागणीत घट दिसून आली आहे. जुलैच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये शुद्ध तेलाची विक्री 7 टक्के इतकी कमी झाली आहे. एप्रिलपासूनच्या आजवरच्या काळात मासिक तत्त्वावर पाहिल्यास ऑगस्ट महिन्यातली विक्री सर्वात कमी नोंदली गेली आहे. 2020 च्या चौथ्या तिमाहीत देशातील तेलाची मागणी 0.43 दशलक्ष बॅरल प्रति दिवस इतकी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डिझेलच्या विक्रीमध्ये ऑगस्टमध्ये 12 टक्के इतकी घट झाली आहे. ही विक्री 4.85 दशलक्ष टन इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मात्र पेट्रोलची विक्री ऑगस्टमध्ये 5.3 टक्के वाढली आहे. विक्री 2.38 दशलक्ष टन इतकी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने रस्त्य़ावरील वाहनांची वर्दळ वाढल्याने पेट्रोलची मागणी गेल्या महिन्यात वाढली आहे.









