बेंगळूर/प्रतिनिधी
सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) च्या पोलीस पथकाने मंगळवारी सकाळी माजी मंत्री दिवंगत जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वाच्या घरी छापा टाकला. ड्रग प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर सीसीबी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. सँडलवुड ड्रॅग प्रकरणी सीसीबी कडून अनेकांची चौकशी सुरु आहे. आदित्य अल्वा हा बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आहे.
सँडलवुड ड्रॅग प्रकरणात सीसीबी पोलिसांनी उत्तर बेंगळूरच्या येलाहंका येथील आदित्य अल्वाच्या घरावर छापा टाकत घराची झडती घेतली. यावेळी गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी कोर्टाकडून सर्च वॉरंट घेण्यात आले असून हेबलच्या जवळ आदित्य अल्वा यांच्या घरी शोध घेण्यात आला. अल्वाच्या कुटुंबातील सदस्यांसमोर सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतल्याचा त्यांनी सांगितले.
आदित्य अल्वा या सँडलवुड ड्रॅग प्रकरणातील १२ आरोपींपैकी एक आहे ज्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सीसीबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेव्हापासून ड्रग प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हापासून आदित्य फरार होता.
कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नावं समोर आली. सुरुवातीला अभिनेत्री रागिनी द्विवेदीचा मित्र रवीशंकरला अटक करण्यात आली. रवीशंकरने चौकशीदरम्यान रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर रागिनीच्याही घरी छापे टाकत तिला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी नावं समोर आली आहेत.