कोल्हापूरच्या क्रिकेट परंपरेतील महान अष्टपैलू काळाच्या पडद्याआड
न्यूझीलंड विरूद्ध 1955 मध्ये खेळला होता कसोटी सामना
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरचे पहिले आणि एकमेव कसोटीपटू एस. आर. उर्फ सदाशिव रावजी पाटील यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. येथील रूईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पाटील यांना 2 डिसेंबर 1955 मध्ये मुंबईत झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी लाभली होती. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या वैभवशाली क्रिकेट परंपरेतील एका महान अष्टपैलू खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
पाटील यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1933 रोजी पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे झाला. संस्थानकाळात प्रगतशील शेतकरी असणाऱया रावजी पाटील आपल्या तिन्ही मुलांना क्रिकेटपटू म्हणून घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले. एस. आर. पाटील, डी. आर. पाटील, एम. आर. पाटील हे एकाच घरातील तीन भाऊ पुढे मोठे क्रिकेटपटू झाले.
एस. आर. पाटील यांनी 1955 मध्ये एकमेव कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्यांना पुन्हा कधीही कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी महाराष्ट्राकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाची झलक दाखविली. 1952 ते 1964 या काळात त्यांनी महाराष्ट्राकडून 36 सामन्यात 3 अर्धशतकांसह 866 धावा काढल्या. तर गोलंदाजीत 30.66 च्या सरासरीने 83 बळी घेतले. इंग्लिश कौंटी स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळाची जादू दाखविली. लँकेशायर, नॉर्थस्टँडफोर्डशायर, नॅन्टविच या कौंटी क्लबकडून खेळण्याचा बहुमान संपादन केला. पाटील यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये 36 वर्षे सेवा बजावली.