सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर गेला आठवडाभरापासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने धुरळा उडाला आहे.
मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामनाच सोशल मीडियावर बघायला मिळाला. दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनातसुद्धा भाजपविरोधात सारे पक्ष एकत्र आल्याचे बघायला मिळाले. कंगना राणावत आणि रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णव गोस्वामी हे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री यांचा एकेरी उल्लेख करत असल्याने यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग मांडला. त्यानंतर विधानसभेत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आमदार एकत्र आल्याचे बघायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे कधी नव्हे ते एकदम आक्रमक झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात सगळ्यांनाच खडे बोल सुनावले मात्र तरीही भाजपचे आमदार ऐकेनात म्हटल्यावर भुजबळांनी चांगलाच दम द्यायला सुरुवात केली.
कंगना राणावतने ‘आपण 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. काय उखडायची ती उखडा’ अशी भाषा केल्यानंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यानंतर भाजपा कंगनाच्या मदतीला धावली आणि शिवसेनेनेसुद्धा कंगनाला जशास तसे उत्तर दिले. जो कोणी मुंबईत राहतो, मुंबईत मोठा होतो त्याने मुंबईप्रती आपले उत्तरदायित्व ठेवले पाहिजे ही आमची भावना असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबई ही मराठी माणसाच्या बापाची असल्याचे म्हटले तर त्यात वावगे काय? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई स्वतंत्र मिळविण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिल्याचे हे ना कंगनाला माहिती असणार ना अर्णवला अशी शिवसेनेने आपली परखड भूमिका मांडली.
शिवसेना पूर्वीसारखी आक्रमक नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली भूमिका थोडी मवाळ केली. बाळासाहेबांची शिवसेना असती तर आज मुंबईबद्दल आणि मराठी माणसाबद्दल बोलणाऱयांना चांगलीच अद्दल केव्हाच घडवली असती. शिवसेनेने भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज्यात सरकार स्थापन केले याचे शल्य भाजपला अजून आहे. हे सरकार कोणत्याही परिस्थितीत पाडायचे अनेक प्रयत्न भाजपने केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही.
कोणीही उठतो तो सरकारविरोधात बोलताना थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करतो. यावरून सगळे लक्षात येत असेल. कंगनाने रविवारी राज्यपालांची भेट घेतली. आतापर्यंत या राज्यात कोणाचेही सरकार असले तरी एखादी व्यक्ती, सेलिब्रिटी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यायचे. मात्र आता राज्यपालांची भेट घ्यायला लागले आहेत. यावरून राज्यातील राजकारण लक्षात यायला वेळ लागणार
नाही.
मुंबईतल्या एका निवृत्त नौदल अधिकाऱयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांसह काही शिवसैनिकांनी या अधिकाऱयाला बेदम मारहाण केल्यानंतर वातावरण तापले. भाजपने या अधिकाऱयाच्या मारहाणीचा जवळपास राष्ट्रीय मुद्दाच केला. सर्व वृत्तवाहिन्यांवर हा एकच विषय चर्चिला जात होता. मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी स्वत: शर्मा यांना फोन केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शर्मा यांची भेट घेऊन त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याची सरकारला विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच शर्मा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे ते पहायला मिळते.
या प्रकरणानंतर शिवसेनेनेही शर्मा यांना केलेली मारहाण ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे बोलताना जळगावमध्ये एका माजी सैनिकाला 2016 मध्ये एका भाजप आमदाराने मारहाण केली होती. या प्रकरणातही राजनाथसिंह यांनी लक्ष घालावे अशी मागणी करताना भाजपच्या शिडातील हवाच काढून टाकली. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला. भाजपकडून केंद्रातील सत्तेचा आणि पदाचा वापर करून एखादे प्रकरण मोठे करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार भाजपला जशास तसे प्रत्युत्तर देत असल्याने भाजपची खेळी यशस्वी होत नाही.
ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत. त्याचे पतन झाल्यास महाराष्ट्रासह मुंबईचे पतन व्हायला वेळ लागणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगताना राज ठाकरे यांना साद घातली. राज ठाकरे यांच्याकडे किती नगरसेवक, आमदार, खासदार आहेत हा वेगळा प्रश्न असला तरी राज यांचा एकेरी उल्लेख करण्याची हिमत कोणी करणार नाही. कारण राज यांनी आपला ठाकरे ब्रॅण्ड जपला आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांचे म्हणणे आहे. आपण आपल्या ब्रॅण्डचा वापर करून व्यवसाय केला त्यामुळे चिक्कार नफा कमावला. पण त्या नादात आपण आपला ब्रॅण्ड टिकवू शकला नसल्याची खोचक टीकाही देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राज यांनी आपला ब्रॅण्ड जपला आहे. आता राज शिवसेनेच्या सादाला प्रतिसाद देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे
प्रवीण काळे