7 हजार 973 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, थर्मल स्क्रिनिंग करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून रखडलेली नीट परीक्षा अखेर रविवारी सुरळीतपणे पार पडली. बेळगाव जिल्हय़ातील एकूण 21 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. 7 हजार 973 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. कोरोनामुळे यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात आली होती. थर्मल स्क्रिनिंग करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी नीट प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून ही परीक्षा घेण्यात आली. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा झाली. दरवषी मे महिन्यात होणारी ही परीक्षा यावर्षी कोरोनामुळे सप्टेंबरमध्ये घेण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱया या परीक्षेच्या आयोजनासाठी परीक्षार्थींच्या आरोग्याची आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. मास्क व हॅन्डग्लोव्ज घालण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. एनटीएकडून विद्यार्थ्यांना मास्क व काळय़ा रंगाचे बॉलपेन देण्यात आले होते.
बेळगाव जिल्हय़ात हिराशुगर इन्स्टिटय़ूट संकेश्वर 660 विद्यार्थी, कल्पवृक्ष मॉडेल स्कूल 660, जैन इंजिनिअEिरग 540, सीटीई सोसायटी चिकोडी 540, केएलई सोसायटी अंकली 480, जैन हेरिटेज स्कूल 480, सदलगा स्कूल 420, अंगडी इन्स्टिटय़ूट 360, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2- 360, केएलएस पब्लिक स्कूल 360, शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल 360, गुड शेफर्ड स्कूल 360, एस. बी. दारूर स्कूल रायबाग 360, जैन इंजिनिअरिंग कॉलेज 300, शांतिनिकेतन स्कूल खानापूर 300, लव्हडेल स्कूल 240, शेख सेंन्ट्रल 240, केएलई इंटरनॅशनल स्कूल 240, सेंट पीटर्स स्कूल 240 व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे 173 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली.
बेळगावमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली
यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे नीट परीक्षा होणार की नाही हा संभ्रम मागील अनेक महिन्यांपासून होता. अखेर ही परीक्षा रविवारी देशभर घेण्यात आली. परंतु अजूनही बऱयाच भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याचा परिणाम हा नीट परीक्षेवरही दिसून आला. रविवारी बेळगावमध्ये परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावल्याचे चित्र दिसून आले.









