एनसीबी गौरव आर्यची लवकरच करणार चौकशी अटक केलेल्या के.जे.च्या चौकशीत गौरवचे नाव
प्रतिनिधी/ मुंबई
सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी एनसीबीने जोरदार कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. एनसीबीने अटक केलेल्या के. जे. ऊर्फ करमजीतच्या चौकशीत त्याचे गौरव आर्यशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यामुळे एनसीबीने गौरव आर्यची चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे.
के. जे. च्या चौकशीत त्याने शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज पुरवित असल्याची कबुली दिली. तर के.जे. हा पॅपरी आणि लिटिल हाइट् येथे ड्रग्ज पुरवठा करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. सॅम्युअल आणि रियाचा भाऊ शोविकला ड्रग्जचा पुरवठा करत होता. त्यानंतर हा सर्व माल रिया आणि सुशांतला दिला जात होता, अशी माहिती मिळाली आहे. करमजीतला एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. शोविकसोबत त्याचे थेट संबंध असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी एनसीबीने तब्बल 7 ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागला आहे. आत्तापर्यंत 6 ते 7 ड्रग्ज पुरवठा करणाऱयांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. रियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईबरोबर गोव्यात छापे घातले होते.
तर यापूर्वी रियाच्या मोबाईल चॅटमध्ये नाव आलेल्या गौरव आर्य आणि त्याच्या संबंधित ठिकाणी हे छापे असल्याचे समोर आले. गोव्यात ड्रग्ज डिलर अनुज केशवानी याने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई केली आहे. सहा ठिकाणी ड्रग्ज माफियांकडून पार्टीचे आयोजन केले जात होते. या कारवाईत आतापर्यंत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. रियाने दिलेल्या माहितीतून अनुज केशवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अनेक नावे समोर आली आहेत. या बरोबरच नव्याने गौरवची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. अटक केलेला के.जे. देखील गौरवच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याच्याभोवती चौकशीचा फास आवळण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे.
गौरव आर्य विरोधात ईडी करणार मनी लॉड्रींगचा गुन्हा ?
ड्रग्ज रॅकेटबरोबरच गौरवची अवैध मालमत्ता ही गोवा, मुंबईसह दुबईत देखील आहे. तसेच त्याचे अनेक राजकीय नेत्यासह भाजपच्या एका आमदाराशी घनिष्ठ संबध असून, त्या आमदारासह त्याची दुबईत भागीदारी असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे त्याचे ड्रग्ज तस्कर कासिमशी देखील संबध असून, त्याच्याबरोबर दुबईत भागीदारी असल्याचा संशय ईडीला असल्याने, त्याच्या विरोधात अवैध मालमत्तेसह मनी लॉड्रींगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी ईडीने सुरु केली आहे.
दिग्दर्शक मुकेश छाब्रा रिया विरोधात दाखल करणार अबु नुकसानीचा दावा
रियाने सारा अली खान, राकुल प्रीत सिंग, सिमॉन खंबाटा यांच्यासह कास्टिंग डिरेक्टर आणि दिल बेचारा चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाब्राचे नावही ड्रग्ज प्रकरणात घेतले आहे. यामुळे मुकेश संतापला आहे. रियाने माझे नाव का घेतले मला याची कल्पना नाही. पण तिने सूडबुद्धीने माझे नाव घेतले आहे, असा दावा तो करतो. मुकेश आपला खुलासा करताना म्हणाला, मी मद्यप्राशन करत नाही, मी धुम्रपान करीत नाही. अमली पदार्थांचे सेवन करणे तर फारच दूरची बात असे असताना रियाने माझं नाव का घेतले ते कळत नाही. यामुळे तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्याने सांगितले.








