बारा दिवसात 20 बळी, आतापर्यंत 40 दगावले
जिल्हय़ात नव्याने 74 पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण 2422
एकूण 1180 जण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण 1202
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून रविवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 40 जण कोरोनामुळे दगावले आहेत. गेल्या काही दिवसात मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून सप्टेंबरच्या बारा दिवसात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी नव्याने 74 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. राज्यातील इतर जिल्हय़ाच्या तुलनेत जिल्हय़ात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी गेल्या काही दिवसात ते वाढत आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्हय़ात एकूण 40 जणांचा मृत्यू झाला. परंतु सप्टेंबर महिन्यात गेल्या 12 दिवसातील मृत्यूचे प्रमाण 20 एवढे आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बाहेर गेलेल्या तिघांचा मृत्यू
जिल्हय़ात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये आरोंदा येथील 65 वर्षीय वृद्ध, कणकवली येथील 65 वर्षीय वृद्ध आणि निवती-कोचरा येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्हय़ाबाहेर गेलेल्या आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 43 वर गेला आहे. मात्र,
प्रशासनाकडे याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
जिल्हय़ात आणखी 74 पॉझिटिव्ह
जिल्हय़ात आणखी 74 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 422 झाली आहे. तसेच बरे झालेल्या 12 रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1180 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ. क्र. विषय संख्या
1 एकूण अहवाल 20109
2 पॉझिटिव्ह आलेले अहवाल 2422
3 निगेटिव्ह आलेले अहवाल 17148
4 प्रतीक्षेतील अहवाल 539
5 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 1202
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1180
8 गृह व शासकीय संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 8501
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 4536









