प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील नियोजित म्हापसा कदंब बसस्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला चालना देण्याचे नगरपालिका मंडळाने ठरविले आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पालिकेच्या 14 व्या वित आयोग निधीतील रु. 3.27 कोटी खर्चून करण्याचा निर्णय पालिका मंडळाच्या बैठकीत घेतला. आमदार जोशुआ डिसोझा यांच्या प्रस्तावानुसार हा ठराव एकमताने मंजूर केला.
नगरपालिकेच्या 14 व्या वित आयोग निधीतून नियोजित म्हापसा कदंब बसस्थानकाची जमीन विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांनी हा प्रस्ताव मांडला. निधीतील 3.27 कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत बांधण्याचा पालिकेचा विचार होता मात्र दोन वेळा निविदा काढून देखील या प्रकल्पासाठी बोलीदार भेटला नाही त्यामुळे हा निधी आता बसस्थानकाच्या कामास वळविण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांसमोर दिली.
शुक्रवारी पालिकेत सुमारे दीड तास नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी आमदार जोशुआ डिसोझा, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, उपनगराध्यक्ष मर्लिन डिसोझा तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. ब्रागांझा म्हणाले की, आरक्षित जाग्याचे सपाटीकरण करून पूर्ण जाग्याभोवती कुंपण घातले जाईल. तसेच शेड उभारून प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था तसेच पेव्हर्स, पदपथ व प्रकाशयोजना केली जाईल. त्याव्यतिरिक्त बाजारपेठेमधील चणेकर लेनमधील पहिल्या मजल्यावरील सुमारे 600 चौरस मीटर जागा ही वीज खात्याला दिली जाईल. याशिवाय मार्केटमधील मांस प्रकल्प हा पालिकेच्या निधीतून उभारला जात होता. परंतु आर्थिक टंचाईमुळे हा प्रकल्प आता 14 व्या वित आयोग निधीतून उभारला जाईल. याला रु. 10 लाख खर्च अपेक्षित आहे असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
बैठकीत जोशुआ डिसोझा यांनी नियोजित बसस्थानकाचा प्रस्ताव मांडला मात्र जोशुआ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी सुरुवातीला या सूचनेला आक्षेप घेतला. सुधीर कांदोळकर म्हणाले की, कित्येक वर्षे प्रशासकीय इमारतीचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे पालिकेने या प्रशासकीय इमारतीचा निधी बसस्थानकाच्या कामासाठी वळवू नये. कारण पालिकेकडे व्यवस्थित जागा नसल्याने विद्यमान पालिकेत नोंदणी तसेच डेटाबेस व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे फाईल्सचे ढिगारे पालिकेत अस्थाव्यस्थ पडलेल्या दिसतात. अनेकदा फाईल्स गायब झालेल्या तक्रारी समोर आल्या आहेत. याशिवाय पालिका मंडळाला बैठक अशा लहानशा कॉन्फरन्स हॉलमध्ये घ्यावी लागते. याकडे कांदोळकर यांनी लक्ष वेधले.
नगराध्यक्ष म्हणाले की, प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी निविदा काढलेली मात्र आम्हाला बोलीदार भेटला नाही याला प्रतित्युतर देताना कांदोळकर म्हणाले की, पालिकेने आतापर्यंत काही कंत्राटदाराचे कामाचे पैसे फेडलेले नाहीत त्यामुळे कंत्राटदार पुढे येण्यास कचरतात. यासाठी पालिकेने कंत्राटदारांना विश्वासात घ्यावे. मात्र सुधीर कांदोळकर सोडल्यास इतर नगरसेवकांचा पाठिंबा हा बसस्थानकाच्या कामाला चालना देण्यास होता.
यावेळी नगरसेवक संदीप फळारी, तुषार टोपले, राजसिंग राणे, रोहन कवळेकर आदींनी 14 व्या वित आयोग निधीतून बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील काम हाती घेतले जावे अशी मागणी लावून धरली. कारण बसस्थानकाचा हा विषय अनेक वर्षे रेंगाळत आहे. बसस्थानक उभारल्यास पालिकेला महसूल प्राप्त होईल असे त्यांचे म्हणणे होते.









