प्रतिनिधी / बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलवाहिनीला कणबर्गीनजीक गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. याची पाहणी करून शुक्रवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभर खोदाई व पाणी काढण्याचे काम सुरू होते. अखेर दुपारनंतर पाणीपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला कणबर्गीजवळ गळती लागली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. यापूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पण पुन्हा गळती लागली आहे. सतत पाणी वाहत असल्याने रस्ता खराब झाला असून परिसरातील घरांनादेखील याचा धोका निर्माण झाला आहे. या जलवाहिनीद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा केला जात असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती सदर जलवाहिनीला लागलेल्या गळतीबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून पाणीपुरवठा मंडळाचे लक्ष वेधले आहे. याची दखल घेवून पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी जलवाहिनीला लागलेल्या गळतीची पाहणी गुरुवारी केली होती. तसेच शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीला लागलेली गळती शोधण्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. पण पाण्याचा अडथळा निर्माण झाल्याने पाणी काढण्यासह खोदाईचे काम सुरू करण्यात आले. दुपारी तीन वाजता पाणीपुरवठा बंद ठेवून खोदाईचे काम सुरू करण्यात आले असता लागलेल्या गळतीची माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर जलवाहिनीला वेल्डिंग करून गळती बंद करण्यात आली. त्यामुळे दुपारी तीनपासून सायंकाळी सात वाजेपर्यत हिडकल जलाशयामधून जलशुद्धीकरण केंद्राला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला. मात्र पाणीपुरवठा बंद ठेवून जलवाहिनीची दुरुस्ती केल्यामुळे रोज शेकडो लिटर वाया जाणारे पाणी बंद झाले आहे. शुक्रवारी सकाळी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यत काम पूर्ण करण्यात आले.








