अमेरिकन ओपन टेनिस : सेरेनाचा पुन्हा स्वप्नभंग, ब्रॅडीही पराभूत, पॅव्हिक-सोआरेस दुहेरीत विजेते
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले असून अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणले. जपानच्या नाओमी ओसाकानेही अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली असून शनिवारी अझारेन्का व ओसाका यांच्यात जेतेपदाची लढत होईल.
अझारेन्काने सेरेनावर 1-6, 6-3, 6-3 अशी मात करून तिसऱयांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. याआधी 2012 व 2013 च्या अंतिम फेरीत सेरेनाने अझारेन्काला हरविले होते. दोघींत आतापर्यंत झालेल्या लढतीत अझारेन्काने 5 व सेरेनाने 18 सामने जिंकले आहेत. चार वर्षाच्या खंडानंतर अझारेन्काने गेल्या महिन्यात पहिले जेतेपद पटकावताना वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2013 नंतर पहिल्यांदाच ती ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. 38 वर्षीय सेरेनाला हरविण्यात मानसिक खेळ खूप मोलाचा ठरला, असे अझारेन्काने नंतर सांगितले. सेरेनाला तिसऱया सेटवेळी दुखऱया पायावर बँडेज बांधून घेण्यासाठी टाईमआऊट घ्यावे लागले होते. सहा वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया सेरेनाने पहिल्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करीत सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण अझारेन्काने आपला खेळ उंचावत दुसरा सेट जिंकला आणि तिसऱया सेटमध्ये सेरेनावर दडपण आणण्यात ती यशस्वी ठरली. एका बिनतोड सर्व्हिसवर तिने सामना संपविला. अझारेन्काने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा दोनदा जिंकली आहे.
चौथ्या मानांकित जपानच्या ओसाकाने अमेरिकेच्याच 28 व्या मानांकित ब्रॅडीवर तीन सेट्समध्ये मात केली. 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱया ओसाकाने ब्रॅडीचा 7-6 (7-1), 3-6, 6-3 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. सुमारे दोन तास ही दर्जेदार लढत रंगली होती. ओसाकाने आता सलग दहा सामने जिंकले आहेत.
पॅव्हिक-सोआरेस पुरुष दुहेरीत विजेते
पुरुषांच्या दुहेरीत क्रोएशियाचा मेट पॅव्हिक व ब्राझीलचा बुनो सोआरेस यांनी जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी आठव्या मानांकित वेस्ली कूलहॉफ (हॉलंड) व क्रोएशियाचा निकोला मेक्टिक यांच्यावर 7-5, 6-3 अशी मात केली. पॅव्हिक-सोआरेस यांनी एकत्र खेळताना पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती. पॅव्हिकने पॉवरफुल सर्व्हिसवर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले तर सोआरेसने प्रतिस्पर्धी जोडीला अवघड फटके मारण्यास भाग पाडले. मेक्टिकने बॅकहँड व्हॉली नेटमध्ये मारल्यानंतर पॅव्हिक-सोआरेसचे जेतेपद निश्चित झाले. सोआरेसने याआधी ब्रिटनच्या जेमी मरेसमवेत 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते तर पॅव्हिकने ऑलिव्हर माराचसमवेत 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद मिळविले होते.