
जगभरात 2 कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. 1 कोटी रुग्ण बरे होण्यास 209 दिवस लागले होते. तर 45 दिवसातच संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 कोटी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा रिकव्हरी रेट 88.64 टक्के आहे. मागील 24 तासांमध्ये जगभरात 2,02,214 नवे रुग्ण सापडले आहेत.
पोपनी वापरला मास्क
पोप फ्रान्सिन पहिल्यांदाच मास्क परिधान करून दिसून आले आहेत. परंतु त्यांचे वाहन लोकांनजीक पोहोचताच त्यांनी मास्क काढला. टाळेबंदीच्या 6 महिन्यांनी पोप फ्रान्सिस यांनी पब्लिक प्रेयरमध्ये भाग घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रार्थनेदरम्यान ते मुलांना भेटले आणि लोकांना हात उंचावून अभिवादन केले आहे.
20 कोटी चाचण्यांची गरज

अमेरिकेत दर महिन्याला 20 कोटी कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे, तरच पुढील वर्षापर्यंत महामारीला नियंत्रित करता येणार आहे. रॉकफेलर फौंडेशन आणि डय़ूक-मार्गोलिस सेंटर फॉर हेल्थ पॉलिसीच्या नव्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. सध्या देशात दर महिन्याला 3 कोटी चाचण्या केल्या जात आहेत.
चेक प्रजासत्ताकमध्ये संसर्ग

चेक प्रजासत्ताक देशात पहिल्यांदाच दिवसभरात 1 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान मार्चमध्ये एका दिवसात सर्वाधिक 377 रुग्ण आढळून आले होते. परंतु चालू महिन्यात प्रतिदिन 500 पेक्षा अधिक नवे बाधित आढळून येत आहेत.
मांजरांमध्ये संसर्ग अधिक

प्रारंभिक अनुमानाच्या तुलनेत मांजरांमध्ये संसर्गाची प्रकरणे अधिक असल्याचे अध्ययनात आढळून आले आहे. संशोधकांनी 102 मांजरांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. 15 मांजरांच्या रक्तात अँटीबॉडी अस्तित्वात होती. मांजरांमध्ये कोविड-19 ची लक्षणे नव्हती, तसेच कुणाचाच मृत्यू झालेला नाही.
जर्मनीत स्वाइन फ्ल्यू
जर्मनीच्या ब्रँडेनबर्ग राज्यात आढळून येणाऱया रानडुकरांमध्ये आफ्रिकन डुक्कर ताप दिसून आला आहे. आफ्रिकन डुक्कर ताप डुकरांसाठी धोकादायक असला तरीही माणसांना प्रभावित करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या तापाची प्रकरणे यापूर्वी अनेक युरोपीय देशांमध्ये दिसून आली आहेत.








