टिळकवाडी पोलिसांची कारवाई , खून करुन भासविला होता अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा खून करुन अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. दीड महिन्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी मंगळवारी चौघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही जण अद्याप फरारी आहेत.
उमेश उर्फ पप्पू बाळू कुऱयाळकर (वय 30, रा. राजहंस गल्ली, अनगोळ), श्याम परशराम गौंडाडकर (वय 30, रा. मेन रोड, गाडगीळ, बसस्टॉपजवळ, अनगोळ), परशराम भरमा पाखरे (वय 36, रा. लक्ष्मी गल्ली, मुचंडी), राहुल सिध्दाप्पा अवानाचे (वय 25, रा. संभाजी गल्ली, मुचंडी) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी मंगळवारी रात्री या चौघा जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
24 जुलै 2020 रोजी अनगोळ येथील आमराईत महेश महादेव अवनी (वय 28, रा. मुचंडी) या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दुसऱयादिवशी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अपघातात महेशचा मृत्यू झाल्याचे सांगत मारिहाळ पोलीस स्थानकात अपघात प्रकरणाची नोंद करण्यात आली होती.
महेशचा मृत्यू अपघातात नसून मारहाणीत झाल्याचे उघडकीस येताच खुनाचा गुन्हा दाखल करुन टिळकवाडी पोलीस स्थानकाकडे तपास वर्ग करण्यात आला होता. 9 ऑगस्ट 2020 रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास हाती घेण्यात आला होता. दीड महिन्यानंतर या प्रकरणातील चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.