प्रतिनिधी/ बेळगाव
मतदार यादी तयार करण्यापूर्वी दोन ठिकाणी असलेली नावे व मृत व्यक्तीचे नाव कमी करण्यात यावे, तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समावेश करण्यात यावे अशा विविध सूचना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मांडल्या. तर बूथ स्तरिय एजंट नियुक्त करण्यासाठी नावे द्यावीत असे आवाहन निवडणूक अधिकारी या नात्याने महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले.
मतदार यादी तयार करण्याकरीता पडताळणीचे काम सुरू झाले आहे. 16 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यापूर्वी मतदार यादीतील चुकीची दुरूस्ती आणि नवीन नावे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच मतदार यादीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मते नोंदवून घेण्यात येतात. याकरिता मंगळवारी महापालिका कार्यालयात दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीएस अशा विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदार यादीमध्ये काही नागरिकांची नावे चुकीची आहेत. तसेच दोन ठिकाणी नावे असल्याने बोगस मतदान होत असते. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची नावे कमी करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही मतदार संघात असलेली नावे कमी करण्यात यावीत, तसेच घरोघरी जाऊन 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदाराचे नाव नोंद करून घेण्यात यावे. मतदार यादीतील छायाचित्र चुकीची प्रसिद्ध होत असल्याने याची दुरूस्ती करण्यात यावी. अशा विविध सूचना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मांडल्या.
केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. मतदार यादी तयार करण्यासाठी यापुढे संगणकी प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. एका मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्यास त्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे नाव दोन मतदार क्षेत्रात असल्यास ते कमी केले जाणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. बूथ स्थरिय मतदारांची नोंद करून घेण्यासाठी तसेच मृत व्यक्तीचे नाव कमी करणे अशा विविध सूचना करण्यासाठी बूथ स्थरिय एजंट नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे बूथमध्ये येणाऱया मतदारांची नावे नोंद करणे व मृत व्यक्तीचे नाव कमी करणे अशी कामे एजंटच्या सूचनेनुसार करता येवू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या प्रतिनिधींनी बूथस्थरिय एजंट नियुक्त करण्यासाठी नावे द्यावीत. असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले. यावेळी दक्षिण विभागाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी एस. बी. दोड्डगौडर, उत्तर विभागाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी एफ. बी. पिरजादे, व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.









