अबु धाबी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक, धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन मंगळवारी अबु धाबीत मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला. दि. 19 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱया आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई इंडियन्स संघाला त्याची प्रतीक्षा होती. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाणार असून स्पर्धेतील सामने दुबई, अबु धाबी व शारजाह या तीन ठिकाणी होतील.
आयोजकांनी रविवारी या स्पर्धेची प्राथमिक रुपरेषा जाहीर केली. यानुसार, प्राथमिक टप्प्यातील सामने होणार आहेत. अव्वल फेरीची रुपरेषा कालांतराने जाहीर केली जाईल.
किवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट व ऑस्ट्रेलियन स्पीडस्टर जेम्स पॅटिन्सन हे देखील मागील आठवडय़ात आपल्या ताफ्यात दाखल झाले असल्याची माहिती मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने दिली. यापैकी जेम्स पॅटिन्सनला लंकेचा जलद गोलंदाज लसिथ मलिंगाने माघार घेतल्यामुळे करारबद्ध करण्यात आले. यंदाच्या आयपीएल हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील विद्यमान विजेता मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपरकिंग्स संघाविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे.
‘त्या’ सात संघांनी इंग्लंड-ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी खर्च केले 1 कोटी!
आगामी आयपीएल स्पर्धेत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या आपल्या अव्वल खेळाडूंना गमवावे, असे एकाही प्रँचायझीला वाटत नाही, असे दिसून आले आहे. एका इंग्रजी सायंदैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 7 आयपीएल संघांनी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या 22 खेळाडूंना मँचेस्टरमधून दुबईला आणण्यासाठी एकत्रित चार्टर विमान आरक्षित केले असून त्यासाठी थोडाथोडका नव्हे तर एक कोटी रुपयांचा खर्च केला आहे. फक्त मुंबई इंडियन्स संघाचा यात समावेश नाही. त्यांच्या ताफ्यातील एकही खेळाडू इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचा नाही. त्यामुळे, त्यांना याची आवश्यकता भासलेली नाही.
सदर वृत्तानुसार, दोन्ही देशांचे आयपीएलमधील विविध संघांशी करारबद्ध असलेले खेळाडू सॅनिटाईज केलेल्या बसमधून स्टेडियममध्ये येतील आणि त्या बसचा ड्रायव्हर त्यापूर्वीच जैवसुरक्षित वातावरणात राहिलेला असेल. खेळाडूंना इमिग्रेशन प्रक्रियेसाठी अधिक थांबवले जाणार नाही आणि एअरक्राफ्टचे सॅनिटायजेशन केलेले असणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत अधिक कमाई कोणाची?
यंदाच्या स्पर्धेत भारतानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कमाई सर्वात अधिक असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे 17 खेळाडू विविध संघांशी करारबद्ध असून त्यांचे या हंगामातील एकत्रित मानधन 86.7 कोटी रुपये असणार आहे. इंग्लंडच्या 11 अव्वल खेळाडूंचे एकत्रित मानधन 43.8 कोटी रुपये असेल.
मांजरेकरना पॅनेलमध्ये घ्या : एमसीएची बीसीसीआयला विनंती
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांना आयपीएल समालोचन पथकातून वगळल्याबद्दल मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य बीसीसीआयवर बरेच नाराज असून त्यांनी मांजरेकरांना पुन्हा पॅनेलमध्ये घ्यावे, अशा आशयाची विनंती केली आहे. मांजरेकर यांनी यापूर्वीच बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडे लेखी क्षमायाचना केली व मंडळाच्या अटी आपल्याला मान्य असतील, असे नमूद केले. पण, यानंतरही त्यांचा मंडळाने विचार केला नसल्याचे पॅनेल निवडीतील निर्णयावरुन स्पष्ट झाले होते. एमसीए सदस्य नदीम मेमन यांनी गांगुली व सचिव जय शाह यांना पत्र पाठवत त्यातून मांजरेकरांचा समावेश करण्याची विनंती केली. संजय मांजरेकर यांनी भारतीय संघातर्फे 37 कसोटी व 54 वनडे खेळले असून याशिवाय मागील काही वर्षापासून ते बीसीसीआयच्या समालोचन पथकात समाविष्ट आहेत. गतवर्षी रविंद्र जडेजावर टिपणी केल्यानंतर ते सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी रहात आले आहेत.
कोटस
यापूर्वी आयपीएल इतिहासात काय घडले, ते आम्ही सर्व मागे ठेवले आहे. नवा हंगाम आहे आणि या नव्या हंगामात आम्ही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत. जेतेपद हेच आमचे लक्ष्य असेल.
-आरसीबीचा कर्णधार विराट कोहली
संयुक्त अरब अमिरातीतील सध्याचे वातावरण उष्ण आहे. त्यामुळे, विशेषतः जलद गोलंदाजांची कसोटी लागू शकते. साहजिकच, सर्व संघांनी जलद गोलंदाजांना व्यवस्थित रोटेट करणे क्रमप्राप्त असणार आहे.
-किंग्स इलेव्हन पंजाबचा मोहम्मद शमी
नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज आणि मंकडिग यावरुन माझे व अश्विनचे एकमत आहे. जसा मी त्याकडे पाहतो, त्याचप्रमाणे अश्विनही पाहतो. त्यामुळे, या मुद्यावरुन आमच्यात मतभेद आहेत, असे अजिबात मानू नये.
-दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग
आम्ही यापूर्वी 5 ते 6 महिन्यांपूर्वी मैदानात उतरलो होतो, शेवटचा व्यावसायिक सामना खेळला होता. त्यानंतर इतक्या प्रदीर्घ कालावधीचा प्रदीर्घ ब्रेक प्रथमच घ्यावा लागला आहे. साहजिकच, सूर सापडण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो.
-दिल्लीचा जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा
आयपीएलमध्ये खेळलेल्या 33 सामन्यात गोलंदाजीची कमी संधी मिळाली व केवळ दोनच बळी खात्यावर असले तरी या हंगामात मी अधिक महत्त्वाकांक्षेने गोलंदाजी करु इच्छितो. संघाच्या आवश्यकतेनुसार, ही भूमिका पार पाडण्यासाठी मी इच्छुक आहे.
-सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकर









