रशिया सरकारकडून लस बाजारपेठेत सादर
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे गॅमालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी विकसित केलेल्या कोविड-19 विरुद्धच्या स्पुटनिक-5 लस्ग्नााrचा डोस लोकांना देण्यास सुरुवात झाली आहे. नजीकच्या भविष्यात या लसीचे प्रादेशिक वितरण करण्याची योजना आखली गेली आहे, अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
मागील सहा महिन्यांपासून सारे जग कोविडवरील लस कधी येते आणि त्याचे वितरण कधी सुरू होते याची प्रतीक्षा करत आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वरील केंद्रद्वारा विकसित करण्यात आलेली आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणारी ‘स्पुटनिक-5’ लस प्रयोगशाळेत आवश्यक गुणवत्ता चाचण्यात उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सदर लसीचा डोस आता लोकांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मॉस्कोचे मेयर सर्जी सोबायनिन यांनी रशियन राजधानीच्या बहुसंख्य रहिवाशांना काही महिन्यांत लस देता येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
रशियाच्या या लसीची शेवटच्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी या महिन्यापासून भारतात सुरू होणार आहे. लस तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणाऱया रशियन डायरेक्ट इन्व्हेस्ट फंडचे सीईओ किरिल दिमित्रीज यांनी सांगितल्यानुसार, या लसीची वैद्यकीय चाचणी भारतासह संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, फिलीपीन्स आणि ब्राझील इथेही या महिन्यात सुरू होईल. या लसीच्या तिसऱया टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येतील. ही लस रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी 11 ऑगस्ट रोजी घोषित केली होती.
भारताला मिळू शकते लस
भारत सरकारची नजरही रशियन लसीवर आहे. रशियाकडून लसीच्या चाचणीशी संबंधित डाटा मागविण्यात आला होता. ऑक्सफोर्डच्या लसीप्रमाणेच गामालेयाच्या लसीची भारतात चाचणी होण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे लवकरात लवकर लस मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
कोरोनावरील लसीचे स्वरुप
रशियाची लस सामान्य सर्दी निर्माण करणाऱया ऍडीनोव्हायरसवर आधारित आहे. ही लस कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आली आहे. कोरोना विषाणू सार्स-कोव्ह-2 मध्ये आढळणाऱया स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल ही लस तयार करते, यामुळे कोरोना संसर्ग झाल्यावर निर्माण होणारा प्रतिसाद शरीरात तयार होतो. मास्कोच्या सेशेनॉव विद्यापीठात 18 जूनपासून याची क्लिनिकल ट्रायल सुरू झाली होती. 38 लोकांवर करण्यात आलेल्या अध्ययनात ही लस सुरक्षित आढळली आहे. सर्व स्वयंसेवकांमध्ये विषाणूच्या विरोधात प्रतिकारकशक्ती दिसून आली आहे.









