वार्ताहर / मौजे दापोली
दापोली नगरपंचायतीकडून शहरातील प्रत्येक नागरीक व दापोली दुकानदार, नोकरदार यांचा ‘कोविड’ बाबत सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सीमिटर व थर्मामिटर गनच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी देखील होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ‘कोविड’ सर्व्हे व प्राथमिक तपासणी करण्याचे काम सुरू होणार असल्याचे दापोली नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.
दापोलीत कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच दापोली बाजारपेठेत दापोली शहरात तालुक्यातून येणाऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रशासनाने पथकांची स्थापना केली होती. मात्र ही पथके सध्या तरी कुठेही दिसून येत नाहीत. यामुळे विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांचे फावले आहे. त्यात येथील व्यापाऱ्यांनी नो मास्क, नो सामान या मोहिमेची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा केवळ बातमी पुरतीच होती की काय? असा प्रश्न आता दापोलीकरांना पडला आहे. कारण दापोलीत खरेदीला येणारे मास्क न घालता बाजारात फिरताना आढळून येत आहेत. शिवाय त्यांना व्यापारी देखील काही चौकशी न करता सामान देताना दिसून येत आहेत. शिवाय दापोलीतील अनेक दुकानदारांना देखील मास्कची अॅलर्जी असल्याचे दिसून येत आहे. येथील बहुतांश व्यापारी मास्कच वापर करत नसल्याचे आढळून येत आहेत.
यामुळे सामान्य नागरीक कोरोनाला घाबरलेले आहेत. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यासाठी देखील भिती वाटत असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे कोविडची लक्षणे नागरीकांमध्ये नाहीत ना यासाठी दापोली नगरपंचायतीकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. या सर्व्हे कामासाठी दापोली शहरातील रामराजे महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व कार्यालयातील कर्मचारी त्यांना सहकार्य करणार आहेत. नागरीकांजवळ कशा प्रकारे संवाद साधायचा, कोणत्या सूचना द्यायच्या, ऑक्सीमिटर व थर्मामिटर गनचा वापर कशा प्रकारे करायचा याबाबत सदरच्या विद्यार्थ्यांना दापोली नगरपंचायतीकडून ट्रेनिंग देण्यात आली आहे.









