वार्ताहर/ निपाणी
निपाणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याचबरोबर मृतांचाही आकडा वाढत असल्याने चिंता वाढली असतानाच, सोमवारी कोरोनाच्या संसर्गाने तालुक्यातील दोघांचा बळी घेतला. यामध्ये निपाणी मेस्त्राr गल्लीतील 75 वर्षीय महिला तर अकोळ येथील 40 वर्षीय युवा कार्यकर्त्याचा समावेश आहे.
निपाणी येथील वृद्धाला गेल्या दोन दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. सोमवारी अधिकच्या उपचारासाठी दवाखान्याकडे नेण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अकोळ येथील 40 वर्षीय युवकालाही कोरोनाची बाधा झाली होती. सोमवारी उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. सदर युवकाचा दोन दिवसानंतर म्हणजेच 10 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधीच कोरोना संसर्गाने बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दिवसभरात 32 बाधित रुग्ण
निपाणी तालुक्यात रविवारी 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच सोमवारी तालुक्यात पुन्हा 32 रुग्णांची भर पडली. यामध्ये निपाणी शहरातील 13 रुग्णांचा समावेश आहे.
रामदुर्ग तालुक्यात दहा जणांना बाधा
रामदुर्ग : रामदुर्ग तालुक्यात सोमवारी दहा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून कोरोनाबाधितांची संख्या 377 झाली आहे. तसेच तिघे कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत 300 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी एका महिलेचे निधन झाल्याने मृतांची संख्या 29 वर पोचली आहे. तालुक्यातील खानपेठ, कलहाळ, मनिहाळ व शहर भागातील भाग्यनगर, जयनगर, लक्ष्मीनगर, नवीपेठ व काशीपेठ येथे रुग्ण आढळले आहेत. यात 4 महिला व 6 पुरुष असून बेळगाव, बागलकोट, हुबळी, डीसीएच रामदुर्ग व घरामध्ये रुग्णावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून समजते.
जमखंडीत 126 जणांना बाधा
जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात सोमवारी 126 कोरोनाचे नवे रुग्ण तर 126 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी दिली.
सोमवारी बागलकोट जिल्हय़ात, जमखंडी तालुक्यात 37, हुनगुंद 26, मुधोळ 25, बदामी 21, बिळगी 10, बागलकोट 7 असे एकूण 126 नवे रुग्ण आढळले तर इतक्याच संख्येने कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्हय़ात आतापर्यंत 7187 बाधित व त्यापैकी 6063 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 80 जणांचा मृत्यू झाला असून 1043 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्हय़ात 71274 व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 62690 निगेटिव्ह, 7187 पॉझिटिव्ह आढळले तर 1085 व्यक्तींचा आहवाल येणे बाकी आहे. जिल्हय़ात 652 कंटेन्मेंट झोन असून 8823 व्यक्ती क्वारंटाईन मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.









