प्रतिनिधी / नागठाणे
पिरेवाडी (भैरवगड) ता. सातारा येथील युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार रुपये खडणी उकळणारे वनविभागाचे वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले याच्यासह अज्ञात दोघे अद्यापही बोरगाव पोलिसांना गुंगारा देत असून सध्या ते नॉट रीचेबल झाले आहेत. दरम्यान, सपोनि डॉ. सागर वाघ यांनी या खंडणी प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला आहे.
शनिवारी रात्री उशिरा ओंकार शिंदे या युवकाने वनविभागाच्या वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले याच्यासह अज्ञात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संशयित योगेश गावित व महेश सोनवले यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले. त्यामुळे बोरगाव पोलिसांना त्यांना पकडणे मुश्किल झाले आहे. त्यातच वनविभागाकडूनही संशयितांना ताब्यात घेण्यासंदर्भात बोरगाव पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचे समजते. बोरगाव पोलीस संशयित वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले या दोघांचाही सध्यातरी कसून शोध घेत आहेत.
सपोनि डॉ. सागर वाघ यांनी या खंडणीप्रकरणाच्या तपासास सुरवात केली असून नुकतीच पिरेवाडी येथे घटनास्थळ,फिर्यादी ओंकार शिंदे याला डांबून ठेवलेल्या वनविभागाच्या रेस्ट हाऊस व खिंडवाडी येथील अप्रतिम लॉज येथे भेट घेऊन माहिती घेतली.या खंडणी प्रकरणात महत्वाचे धागेदोरे ही त्यांच्या ताब्यात आल्याचे समजते. वनविभागामार्फतही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू झाली आहे.
बोरगाव पोलिसांकडून या खंडणीप्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली असून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या वनपाल गावित व वनसंरक्षक सोनवले यांना लवकरच पकडू. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर आणखी असे प्रकार घडले असतील तर संबंधितांनी तात्काळ बोरगाव पोलीस ठाण्याशी अथवा माझ्याशी संपर्क साधावा. – सपोनि. डॉ. सागर वाघ, बोरगाव पोलीस ठाणे









