कोरोना महामारीचा प्रभाव कमी होण्याचा मार्ग अजूनही कोणाच्याही दृष्टिपथात येत नाही. काही देश कोरोनाच्या प्रभावाने इतके डबघाईला आले आहेत की तिथली अर्थव्यवस्था पूर्ववत व्हायला अनेक वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. त्यासाठी त्यांनी कोरोना म्हणजे Aम्t द उद् अर्थात ‘देवाची करणी’ असल्याचे म्हटले आहे. भारतातसुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाला ‘देवाची करणी’ म्हणून संबोधित करत अर्थव्यवस्थेवर ताण पडल्याचे निवेदन केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये मानवी शक्तीपलीकडील नैसर्गिक घटना उदाहरणार्थ तीव्र भूकंप, चक्रीवादळ, महापूर, त्सुनामीसारख्या घटनांचा ‘देवाची करणी’ म्हणून कायद्यानुसार उल्लेख केला जातो. या कायद्यानुसार काही अपवादात्मक सुरक्षा प्रदान केली जाते. आता ‘देवाची करणी’ म्हटल्यावर लगेच अंधश्रद्धा म्हणून काही लोक आक्षेप घेतीलही, तरीही आपण कोरोना ही निसर्गाने आपण काहीही करू शकतो या अहंकाराला दिलेली चपराक आहे हे नाकारू शकत नाही. वैज्ञानिकदृष्टय़ा सांगायचे तर न्यूटनच्या नियमानुसार ‘प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते’. कोरोनाही आपण निसर्गाशी गैरव्यवहार केलेल्या क्रियेसाठी एक प्रतिक्रिया आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर आपल्या जीवनात येणाऱया सर्व दु:खांचे कारण म्हणजे आपण निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा परिणाम आहे. कोरोनाच्या माध्यमातून या ‘देवाची करणी’ बद्दल आपल्याला निसर्गाने विचार करण्यास भाग पाडले आहे आणि याचे पूर्ण सत्य उत्तर जो निसर्ग आणि त्या पाठीमागील निसर्ग नियंत्रण करणारा देव, ज्याला माहीत आहे तोच देऊ शकतो. संत तुकाराम महाराज हे एक असे अधिकारी आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात स्वानुभवावरून सांगतात.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलावितो हरिविण ।।1।। देखवि ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ।।2।। माणसाची देव चालावी अहंता । मीच करता म्हणो नये ।।3।। वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ।।4।। तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे चराचरी ।।5।।
तुकाराम महाराज विचारतात ‘हा देह कोणाच्या सत्तेने चालत आहे? हरिवाचून दुसरा कोण ही शक्ती देतो? सर्वांच्या डोळय़ांना पाहण्याचे व कानांना ऐकण्याचे सामर्थ्य देणारा एक हरीच आहे, त्याचे भजन करण्यास चुकू नका. सर्व क्रिया चालवणारा हरीच आहे म्हणून माणसाने स्वतःला अहंकाराने कोणत्याही कर्माचा कर्ता समजू नये. वृक्षाची पानेसुद्धा त्याच्याच सत्तेने हलतात, मग मी अमुक केले असा गर्व करावयास जागाच नाही हे लक्षात घ्या. विठ्ठल हा सर्व चराचरात भरलेला आहे. त्याच्या विरहित असा एकही पदार्थ जगतात नाही.
या अभंगाचा अर्थ फार गहन आहे तरीपण ‘देवाची करणी’ म्हणजे काय, ती कशी समजून घ्यावी व त्यासाठी काय करावे याचे उत्तर या अभंगात आहे. आपण आपल्या डोळय़ाने पाहू शकतो, व्यवहारात अनुभवू शकतो की आपण सर्वजण पूर्णपणे निसर्गाच्या नियंत्रणात आहोत. कितीही नास्तिक व्यक्ती असली तरी हे सत्य ती नाकारू शकत नाही. आपल्या शरीराची प्रत्येक क्रिया ही निसर्गाच्या नियंत्रणाखाली चालते. उदाहरणार्थ आपल्याला सर्वाना श्वासोच्छ्वास करण्यास म्हणजे जगण्यास सर्वात आवश्यक ती हवाही मानवनिर्मित नाही. ती निसर्गाकडूनच प्राप्त होते. मग बाकी सर्व वस्तूंचे काय? शरीराला लागणारे सर्व काही निसर्गाकडूनच
प्राप्त होते. एवढेच नाही तर आपले स्थूल शरीरसुद्धा निसर्गातील घटक पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यापासून बनलेले आहे. या पलीकडे आपल्याला ज्ञान नाही. निसर्ग कोण चालवितो हे आपण जाणत नाही. त्या निसर्गकर्त्यांनी या निसर्गामध्ये राहणाऱयांसाठी काही नियम बनविले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला दु:ख भोगावे लागते. या निसर्गातील कोणतीही वस्तू आपण स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोगराई यासारख्या दु:खांचा सामना करावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला स्वानुभवावरून सांगतात की आपल्या शरीरासहित सर्व निसर्ग चालविणारा ‘हरी’ म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. आता तुकाराम महाराज कशाच्या आधारावर हे सांगत आहेत? स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायात दहाव्या श्लोकामध्ये सांगतात. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते
हे कौंतेय! माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती (निसर्ग) माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती व संहार होतो.
संत तुकाराम महाराज हे अंधश्रद्धेने नाही तर अनुभव घेऊन आमच्या उद्धारासाठी हे रहस्य सांगत आहेत. आपण सध्या आधुनिक युगात रिमोट कंट्रोलनी एका बटणाच्या दाबण्याने सर्व जग चालवू शकतो या अहंकारात होतो पण कोरोनने आपली मर्यादा दाखवून दिली आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’. याचा अर्थ विज्ञानाच्या नियमानुसार पाणी हे नेहमी सखोल भागाकडे धावते मग 100 फूट उंच असलेल्या झाडावरच्या असंख्य नारळांमध्ये पाणी कसे? हीच ‘देवाची करणी’ आहे! ती देव माहीत असलेल्या संत तुकाराम महाराजांसारख्या अनुभवी व्यक्तीकडूनच आपल्याला भगवद्गीतेसारख्या शास्त्राच्या आधारे समजून घेता येते. त्यासाठीच तर मानवाला बुद्धी दिली आहे.
आपल्याला भगवान श्रीकृष्णाने दिलेला मनुष्यदेह निसर्गाशी समतोल राखून कसा आणि कशासाठी वापरावा हे शिकवण्यासाठी भगवद्गीता दिली आहे. भगवद्गीतेमध्ये नैसर्गिक आपत्ती का येतात, त्यावर काय करावे ही ‘देवाची करणी’ कशी आहे व कोरोनासारख्या सर्व दु:खातून कायमचे कसे मुक्त व्हावे या सर्वांची माहिती दिली आहे. यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाने वाचणे खरेतर बंधनकारक आहे. पण आपण टाळाटाळ करतो, म्हणून आपल्याला दु:खाला सामोरे जावे लागते. यासाठी प्रत्येकाने हा ग्रंथ वाचून भगवंताच्या आज्ञेचे पालन करावे, अन्यथा आपला मनुष्यजन्म वाया चालला आहे हे जाणावे.
वृंदावनदास








