हुतात्मा सैनिकांना ’लूजर्स’ संबोधिल्याचा नियतकालिकाचा दावा : बिडेन यांच्याकडून टीकास्त्र
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नवी समस्या उभी राहिली आहे. अटलांटिक नियतकालिकानुसार ट्रम्प यांनी युद्धात हुतात्मा झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांना ‘लुजर्स’ (पराभूत) संबोधिले आहे. ट्रम्प स्वतःला दीर्घकाळापासून सशस्त्र दलांचा चॅम्पियन ठरवत आले असून त्यांनी सैन्याला पुन्हा सामर्थ्य प्राप्त करून दिल्याचाही दावा केला आहे. परंतु सैनिकांसाठी कथितरित्या पराभूत शब्दाचा वापर केल्याचा आरोप झाल्याने आता त्यांना डेमोक्रेट्स आणि अन्य विरोधकांच्या टीकेचा तोंड द्यावे लागत आहे.
डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडन यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. माझा मुलगा बीयू हा इराकमध्ये तैनात राहिला होता, तो कधीच हरला नव्हता. 2015 मध्ये त्याचा मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता, तुमचा मुलगा सद्यकाळात अफगाणिस्तानात असता तर तुम्हाला काय वाटले असते? जर तुम्ही मुलगा, मुलगी, पत्नी किंवा पती गमावला तर कसे वाटणार अशा प्रश्नार्थक विधानांची सरबत्ती करत बिडेन यांनी ट्रम्प यांच्या विधानाला अपमानास्पद आणि गलिच्छ ठरविले आहे.
मी बोललोच नाही
दुसरीकडे ट्रम्प आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. सैनिकांना पराभूत ठरविणारे विधान मी केलेलेच नाही. ही बनावट कहाणी आहे, लोक अशाप्रकारचे आरोप कसे करू शकतात? माझ्यासाठी सैनिकच खरे नायक आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी माजी सैन्याधिकारी जॉन एफ. कैली यांच्यावर टीका केली आहे. कैली हे व्हाइट हाउसमध्ये चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत. कैली हे पात्र नव्हते तसेच त्यांनी चांगले काम न केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे ट्रम्प म्हणाले.
सैन्याचे वृत्तपत्र
मिलिट्री टाइम्सच्या नव्या सर्वेक्षणानुसार सैनिकांमध्ये बिडेन यांना (41 टक्के) ट्रम्प (37 टक्के) यांच्यावर आघाडी मिळविली आहे. हे पाहता अध्यक्ष ट्रम्प यांनी त्वरित सैन्याचे प्रलंबित मुद्दे निकालात काढण्याचा प्रयत्न केला आहे. सैन्याचे वृत्तपत्र ‘स्टार अँड स्ट्राइप्स’चे वित्तसहाय्य बंद केले जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हे वृत्तपत्र सैन्याला माहिती देत राहणार असल्याचे ते म्हणाले. टॅब्लॉयड आकारातील हे वृत्तपत्र 1860 पासून सुरू आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत हे वृत्तपत्र बंद करण्याचा आदेश दिला होता.
नियतकालिकाचा दावा
2018 मध्ये ट्रम्प यांनी फ्रान्स दौऱयादरम्यान पहिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या स्मारकाला भेट देण्यास नकार दिला होता असा दावा अटलांटिक नियतकालिकाने केला आहे. मी त्या स्मारकाच्या ठिकाणी का जावे, तेथे तर लूजर्स (हरलेले किंवा पराभूत) आहेत असे ट्रम्प यांनी एका अधिकाऱयाशी बोलताना म्हटल्याचा आरोप नियतकालिकाने केला आहे.









