प्रतिनिधी /रत्नागिरी :
बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्हय़ात तब्बल 173 नव्या रूग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची एका दिवसातील विक्रमी रूग्णसंख्या आहे. यामध्ये रत्नागिरी बाजारपेठेत करण्यात आलेल्या ऍन्टीजेन चाचणीत 9 पॉझीटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिह्यातील बाधितांची एकूण संख्या 4 हजार 372 झाली आहे. दरम्यान, आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे जिह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या 141 वर पोहचली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 3 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील 70 वर्षीय तर मंडणगड येथील 60 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांवर जिह्यातील विविध ठिकाणी उपचार सुरु असून 90 जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. जिह्यातील उपचार घेणाऱयांची संख्या 736 असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिह्यात गुरुवारी अँटीजेन चाचणीसाठी 197 नमुने घेण्यात आले. त्यामुळे घेतलेल्या नमुन्यांची संख्या 4526 वर पोहचली. गुरुवारी घेतलेल्या नमुन्यांपैकी 113 जण बाधित असल्याचे आढळले. अँटीजेनमध्ये एकूण 781 जण बाधित असल्याचे आढळले. गुरुवारी आढळलेल्या अँटीजेन बाधित रुग्णांची संख्या दापोली 1, खेड 52, गुहागर 5, चिपळूण 23, रत्नागिरी 23, लांजा 9 अशी एकूण बेरीज 113 वर पोहचली आहे. आरटीपीसीआर टेस्टचाचणीसाठी 2 सप्टेंबर संध्याकाळ अखेर व 3 रोजी प्रसिध्द दापोली 1, खेड 2, चिपळूण 17, संगमेश्वर 7, रत्नागिरी 25, लांजा 8 असे एकूण 60 रुग्ण आढळले.
रत्नागिरी जिल्ह्यात 49 जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध उपचार केंद्रामध्ये 64 जणांची नव्याने भरती झाली असून आतापर्यंत 3414 एवढे बाधित रुग्ण सापडले आहे. 2636 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. 646 एवढे रुग्ण संस्थात्मकरितीने दाखल आहेत.
चिपळुणात एकाचदिवशी 40 रूग्ण
बुधवारी दिवसभरात आलेल्या अहवालानुसार तब्बल 40 नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता तालुक्याचा बाधितांचा आकडा 1212वर गेला आहे. बाजारपेठेतील व्यापाऱयांसाठी कै. अण्णासाहेब क्रीडा संकुलात दुसरा अँटीजेन चाचणी कक्ष गुरूवारपासून सुरू करण्यात आला आहे.
मध्यंतरी कोरोनाबाधितांची संख्या थोडी कमी होताना दिसत होती. मात्र गणेशोत्सवापूर्वी व सणावेळी अनेकांकडून मोडले गेलेले नियम पाहता त्याचा फटका बसू लागला आहे. दरदिवशी 30च्या पुढे रूग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे आता रूग्णांसह प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. बुधवारी सापडलेल्या नव्या 40 रूग्णांमुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा 1212वर गेला आहे. यात शहरातील 578, ग्रामीण भागातील 634 रूग्णांचा समावेश आहे. एकूण रूग्णापैकी 919 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 75.83 टक्के आहे. सध्या 256 जणांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यातील 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱयांनाही लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यासह कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पवनतलाव मैदान परिसरात नागरिकांसाठी अँटीजेन तपासणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.









