ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना महामारीच्या संकटकाळात पुण्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करणाऱ्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज, आर्ट ऑफ लिव्हिंगचा विशेष सन्मान पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंचे महाराष्ट्राचे अॅपेक्स मेंबर शेखर मुंदडा आणि आयएएचव्हीचे प्रतिनिधी आदित्य जोशी यांनी सन्मान स्विकारला. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूजच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथे नव्याने बांधलेल्या कोविड केअर विशेष रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर देण्यात आले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 6 कोटींची वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन पाईपलाईन, बेड्स, अन्न, अन्नधान्य, स्कॅनर, मास्क, पीपीई किट, फेस शील्ड देण्यात आली आहेत. सीएसआरच्या माध्यमातून ही मदत उभी करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या विनंतीवरुन ही मदत करण्यात आली.
शेखर मुंदडा म्हणाले, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूजच्या सहाय्याने पुण्यामध्ये कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 2000 पीपीई किट्स, 2000 फेस शिल्ड, 2000 एन 98 मास्क, 7 स्वॅब बूथ, 300 थर्मामीटर, 150 पल्स ऑक्सिमीटर, 500 इम्यूनिटी बूस्टर ड्रॉप्स आदी मदत देण्यात आली.
आदित्य जोशी म्हणाले, कंटेनमेंट झोनसाठी 10 हजार रेशन किट, 2000 नाडी ऑक्सिमीटर, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांसाठी 25 हजार मास्क, 8 लाखांची 3 एचएफएनसी मशीन, कोविड केअर सेंटरसाठी 1600 बेड आजपर्यंत देण्यात आले आहेत. याशिवाय इतर वैद्यकीय उपकरणे नायडू रूग्णालयात संस्थेच्या वतीने पुरविण्यात येत आहे.