वार्ताहर/ निपाणी
घरगुती असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने आणि कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करत साजरा करावा, या प्रशासनाच्या आवाहनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळाला. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती नगरपालिकेकडे द्याव्यात, या आवाहनालाही गणेश भक्तांनी प्रतिसाद देत मूर्ती पालिकेकडे सुपुर्द केल्या. पण या मूर्ती निपाणी पालिका प्रशासनाने पट्टणकुडी हद्दीतील कचरा डेपोत ठेवताना विटंबना केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्यामुळे गणेशभक्तांनी झाल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
काही गणेश भक्तांना विसर्जनासाठी देण्यात आलेल्या गणेश मूर्ती पालिका प्रशासनाने कचरा डेपोत ठेवल्याचे समजले. यानंतर गणेश भक्तांनी लागलीच कचरा डेपोकडे धाव घेत पाहणी केली असता तेथे सर्वच मूर्तींची विटंबना झाल्याचे निदर्शनास येताच संताप व्यक्त केला. यानंतर पालिका अधिकाऱयांसह पोलीस प्रशासनाला यासंबंधी जाब विचारण्यात आला. निरुत्तर झालेल्या अधिकाऱयांनी एकमेकाकडे बोट दाखवत आपली बाजू झटकण्याचा प्रयत्न केला.
संतापलेल्या उपस्थित गणेश भक्तांनी याठिकाणी पालिका अधिकाऱयांचा निषेध करताना संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर खडकलाट पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणेश मूर्तींची विधीवत पूजा करून आरती केली. यानंतर खडकलाट हद्दीतील एका विहिरीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.









