प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी शहरासह परिसरात हजेरी लावली. केवळ मोजकाच वेळ पाऊस पडला. मात्र हा पाऊस जोराचा होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे भात पिकांना पोषक वातावरण मिळाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून उष्म्यामध्ये बऱयापैकी वाढ झाली होती. याचबरोबर हवामानात बराच बदल झाला होता. याचा प्रत्यय बुधवारी सर्वांनाच अनुभवायला मिळाला. बुधवारी दुपारी काही भागात पावसाचा शिडकावा झाला. पण सायंकाळी 6 च्या सुमाराला पावसाने शहर आणि परिसरात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे साऱयांचीच धावपळ उडाली. भाजी विक्रेते, फेरीवाले व इतर व्यापाऱयांची तारांबळ उडाली.
पाऊस नसल्याने रेनकोट किंवा जॅकेट न घेता आलेल्या वाहनचालकांना वाटेतच थांबावे लागले. छत्री न आणता घराबाहेर पडलेल्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाचा आसरा घ्यावा लागला. पाऊस कमी होईल असे वाटत असताना अचानक जोरदार सरी कोसळत होत्या.
या पावसामुळे काही ठिकाणी पाणीच पाणी झाले. सुमारे 6 वाजता सुरू झालेला पाऊस 15 ते 20 मिनिटे पडला. ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे या पावसाचा शेतकऱयांनाही फायदा झाला.









