वार्ताहर/ आमोणे
आमोणे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सालिया सदानंद गावस यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच काशिनाथ म्हातो यांनी ठरल्याप्रमाणे जुलै महिन्यात आपला राजीनामा सादर केला होता. 28 ऑगस्ट रोजी आमोणे पंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. डिचोली गटविकास कार्यालयाचे अधिकारी नवनाथ आम्रे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेत पंच सदस्य तथा माजी सरपंच संदेश नाईक यांनी गावस यांचे नाव सुचविले तर सांघवी सागर फडते यांनी अनुमोदन दिले.
सालीया गावस यांनी सरपंचपदासाठी एकमेव अर्ज सादर केल्याने गावस यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले. पंच सदस्य शाबा गावस, विजेश सावंत यांनीही गावस यांना समर्थन दिले.
माजी सरपंच काशिनाथ म्हातो व कृष्णा गावस या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. पंचायत सचिव सुदेश फडते यांनी निवडणूक अधिकाऱयांना सहकार्य केले.









