काश्मीरच्या शासकीय कर्मचाऱयाचा समावेश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्हय़ात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तेथील एका दहशतवादी मॉडय़ूलचा पर्दाफाश केला आहे. काश्मीर खोऱयात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया पुन्हा वाढविण्याकरता या मॉडय़ूलने प्रयत्न चालविले होते. पोलिसांनी या मॉडय़ूलच्या 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
हे तिन्ही दहशतवादी आयएसआय हँडलर मोहम्मद कासिमच्या संपर्कात होते. तीन दहशतवाद्यांपैकी एक शासकीय कर्मचारी आहे. तर एक मजूर असून तिसऱयाचे स्वतःचे दुकान आहे. तिघांच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्यात अनेक निनावी व्यवहार आढळून आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी वजीर यांनी दिली आहे.
याप्रकरणी अजून काही जणांना अटक केली जाणार आहे. हे आरोपी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते आणि त्यांना आमिष दाखवून स्वतःच्या जाळय़ात ओढू पाहत होते असे त्यांनी सांगितले आहे.
11 संशयितांवर नजर
आयएसआय हँडलर या लोकांचा वापर गाइडच्या स्वरुपात करू पाहत होता, घुसखोरीवेळी दहशतवाद्यांना आवश्यक सामग्री पोहोचविण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार होती. याप्रकरणी 11 जण संशयित आहेत. यात जम्मूतील एक महिलाही सामील असून तिने आयएसआय हँडलर कासिमची भेट घेतल्याचे तसेच रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले आहे अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. लष्कर-ए-तोयबाचे काश्मीरमधील नेटवर्क नष्ट करण्यास सैन्याला यश आले आहे.









