प्रतिनिधी / बार्शी
कोरोना आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने मोफत पुरवठा करण्यात आलेल्या धान्य वितरणात संबंधित कासारी ता बार्शी येथील रेशन दुकानदाराने अनियमितता आणि घोटाळा केला आहे तरी याबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी सागर आंबूरे आणि इतर गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन पुरवठा अधिकारी ऋषिकांत धनवडे यांना देण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर बातमी अशी की , कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने एप्रिल ते जुलै या चार महिन्यात मोफत आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र कासारी येथील संबधित स्वस्त धान्य दुकान नंबर ४४ या दुकानाचे शॉप मॅनेजर महादेव बाबुराव जगताप यांनी तीन वेळा मोफत धान्य वाटप केले आहे. तसेच सदर दुकानदार कार्ड धारकांना उद्धट भाषा वापरतो.
महिन्यातून जेमतेम चार दिवस मोजक्या लोकांना धान्य वाटप करून वाटप संपले असे सांगतो. तसेच कार्ड धारकांना रीतसर पॉस मशीनची पावती देत नाहीत तरी याबाबत सविस्तर चौकशी करून संबधित दुकान निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रभावती गीते,तुकाराम गोरे,दशरथ माळी, जिजाबाई माळी, भालचंद्र पाटील, कमशाद सैय्यद, दत्तात्रय माळी, कल्याण चव्हाण,, तानाजी चव्हाण, शिवाजी गोरे, सुमारे तीस नागरिकांच्या सह्या आणि अंगठे आहेत.
सदर तक्रारीवरून रीतसर चौकशी आणि दुकानाची तपासणी करून यामध्ये संबंधित रेशन दुकानदार दोषी आढळून आल्यास योग्य त्या कारवाई साठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला जाईल अशी माहिती पुरवठा अधिकारी धनवडे यांनी दिली.
Previous Articleझाडावरून पडून नरतवडे येथील युवकाचा मृत्यू
Next Article सांगली जिल्हय़ात विक्रमी 998 पॉझिटिव्ह, 32 बळी









