‘किसान गोल्ड’ ब्रॅण्ड नावाखाली शेतकऱयांना होणार उपलब्ध
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होतो. तसेच रासायनिक खतांपासून उत्पादित मालही उच्च दर्जाचा नसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सेंद्रीय, गांडुळ खतांचा वापर वाढलेला आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत आता शेतकरी या सेंद्रीय खतांच्या वापराकडे वळताना दिसत आहेत. शेतकऱयांना हे खत किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या माध्यमातून स्वत:ची सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येणार आहे. ‘किसान गोल्ड’ या ब्रँडखाली हे खत शेतकऱयांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खत निर्मिती करणारा तालुका खरेदी विक्री संघ हा जिल्हय़ातील पहिला संघ ठरणार आहे.
तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विठ्ठल देसाई यांनी संघाच्या माध्यमातून शेतकऱयांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला आहे. संघाच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो टन रासायनिक व सेंद्रीय खतांची विक्री केली जाते. विविध कंपन्यांच्या या खतांचा शेतकरी वापर करीत असतानाच अशाप्रकारे संघाने स्वत:च सेंद्रीय खत निर्मिती केली तर? असा विचार देसाई यांच्या डोक्यात आला व त्यांनी संघाच्या संचालकांच्या तसेच व्यवस्थापक व इतर अधिकाऱयांच्या कानी घातली व सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
इतर प्रक्रिया होईपर्यंत तयार करून घेणार
याबाबत बोलताना तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई म्हणाले, आम्ही संघाच्या माध्यमातून किसान गोल्ड या ब्रँडनेमचे सेंद्रीय खत बाजारात आणणार आहोत. यात जिओमिल, निम पेंड, प्रोटोमिल व हार्टीमिल या सेंद्रीय खतांसोबतच गांडूळ खतही असणार आहे. शेतकऱयांना परवडेल, अशा भावात आणि दर्जेदार खत निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. सद्यस्थितीत परवाना व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आम्ही एका कंपनीकडून हे खत तयार करून घेणार आहोत. लवकरच आम्ही स्वत:चा खत निर्मिती प्लांट सुरू करण्याबाबतची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांच्या सहकार्याने पाऊल
ही सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्यासह संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सावंत, संचालक प्रकाश परब, मिलींद मेस्त्राr, महेंद्र राणे, विनोद मर्गज, भालचंद्र साटम, रमाकांत राऊत, सुप्रिया नलावडे, विनिता बुचडे, व्यवस्थापक अनिल सुखटणकर, गणेश तावडे, संदीप तोरस्कर आदींसह सर्वांची साथ आहे. शिवरामभाऊ जाधव व मनोहर सावंत यांनी संघाची लावलेली ही वेल तेवढय़ाच ताकदीने पुढे नेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आज बाजारात विविध कंपन्यांची सेंद्रीय खते येत असताना संघाच्या माध्यमातून हे उत्पादन आणून शेतकऱयांचा विश्वास संपादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे देसाई यांनी सांगितले.
तालुका संघांना विक्री करणार
सद्यस्थितीत आमच्या संघाच्या नावे किसान गोल्डच्या नावाने ही खत निर्मिती करून फक्त शेतकरी व जिल्हय़ातील खरेदी विक्री संघांनाच हे सेंद्रीय खत घाऊक दराने विक्री करणार आहोत. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. शेतकऱयांनी रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रीय खत, सेंद्रीय शेतीकडे वळावे, यासाठीच आम्ही हे धाडसी पाऊल उचलले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात नियमित पद्धतीने संघांच्या माध्यमातून शेतकऱयांना सेवा देत असताना संघाचे स्वत:चे उत्पादन असावे, असा विचार करून हे पाऊल उचलले आहे. अशाप्रकारे सेंद्रीय खत निर्मितीत उतरणारा आमचा जिल्हय़ातील पहिला संघ आहे. शेतकऱयांच्या साथीने आम्ही यात यशस्वी होऊ, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.









