मासे पकडताना तोल नदीत गेल्याने घटना
वार्ताहर / सातार्डा:
सातार्डा ख्रिश्चनवाडी येथील पावलू कामिल मार्णेकर (28) या युवकाचे तेरेखोल नदीपात्रात बुडून अपघाती निधन झाले. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. नदीमध्ये जाळे टाकून मासे पकडताना तोल गेल्याने पावलू मार्णेकर मृत्युमुखी पडला.
याबाबतची खबर त्याचे वडील कामिल (बाबलो) पावलू मार्णेकर यांनी सातार्डा पोलीस दूरक्षेत्रामध्ये दिली. पावसाळय़ाच्या सुरुवातीनंतर पावलू मार्णेकर हा युवक जाळे टाकून मासे पकडत असे. रविवारी सकाळी रोजच्याप्रमणे तेरेखोल नदीपात्रालगत जाळे टाकून मासे पकडत होता. बाजूच्या बागेत एका कामगाराला घेऊन वडील कामिल मार्णेकर नारळ जमा करीत होते. पावलू जाळे टाकून मासे पकडत असताना नदीपात्रात पडल्याचे समजताच वडिलांनी त्वरित त्याठिकाणी धाव घेतली. पावलूला नदीपात्रातून बाहेर काढून शरीरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यानंतर मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर यांनी पावलू मार्णेकरची तपासणी करून मृत घोषित केले. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल शर्मा यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर, हवालदार व्ही. व्ही. केरकर, गुरुदास नाईक, कर्मचारी ओम उपस्थित होते. सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये, ज्ञानदीप राऊळ, सचिन नाईक, शुभम शिरोडकर यांनी पोलिसांना सहकार्य केले. नदीपात्रात मृत्यूमुखी पडलेल्या पावलू मार्णेकरच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.









