ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर वाढविण्याची गरज
प्रतिनिधी / सांगली
सांगलीत कोरोना संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मृत्यूदर ४.१० टक्क्यांवर पोहचला आहे. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढविण्याची गरज आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची घोषणा शासनाने केली होती. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
फडणवीस यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सांगलीतील परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. रुग्णांना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट लवकर मिळत नाही. ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. रुग्णांना बेड मिळत नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. राज्यांपेक्षा सांगलीचा मृत्युदर जास्त आहे. व्हेंटिलेटर तसेच अँटिजेन चाचण्या वाढविल्यास मृत्यूचे प्रमाण घटेल.