प्रतिनिधी / मुरगूड
औद्योगिक क्षेत्रात वेल्डर कामगारांची कमतरता असल्याचे चित्र असून वरकरणी कष्टाचे व धोकादायक वाटणाऱ्या वेल्डर हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने ही कामगारांची कमतरता दिसते.
औद्योगिक क्षेत्रात वेल्डर कामासाठी स्थानिक कामगारांची सध्या वाणवा आहे. परप्रांतीय देखील कोरानामुळे आपआपल्या भागात निघून गेले आहेत. जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल पंचतारांकित या ठिकाणी औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात विस्तारीत झाल्या आहेत. येथील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के कारखाने फॅब्रीकेशनचा वापर करुन बांधलेले आहेत. तर कारखान्यामध्ये वेल्डींगची कामे अनेक प्रकारची आहेत. यामध्ये शेती औजारे, फौन्ड्री भट्टी, टॅक, इरिगेशन पाईपींग, वैरण व ऊस वाहतूक बैलगाडी, लोखंडी कैच्या, दवाखाना व हॉटेल मधील बेड, टेबल, फर्निचर, किचन ट्रॉलीज, खवा मशीन कापणी व मळणी यंत्रे, ग्रील्स, गेट, कैची, रुपींग कामे करणे आदी कामासाठी वेल्डर कामगार आवश्यक असतात. हे काम करणाऱ्या कामगारांना दहा ते पंधरा हजार महिना पगार दिला जातो.
तथापी हे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. वस्तूतः या क्षेत्रातही अपघात कमी करणारे नवनवीन साहित्य उपलब्ध झाले आहे. (उदा. हेल्मेट, गॉगल, काचा, शूज, मशिनरी, रॉड ) त्यामुळे अपघात कमी होतात. तरीही सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या वेल्डर कामगारांची मोठी कमतरता भासत आहे. याचे चित्र औद्योगिक वसाहतीमध्ये पहावयास मिळत आहे.
करीअरची संधी – वेल्डींग क्षेत्रात कामाची मोठी संधी तसेच नोकरीचीही हमी आहे. फॅब्रीकेशन कामेही वजनावर (मेट्रीक टन) मिळतात. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे नवीन मुलांना या क्षेत्रात करिअर संधी
आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासकिय व खाजगी आयटीआय ची संख्या सुमारे 52 आहे. यापैकी वेल्डर कोर्स असलेल्या संस्थेत फक्त 20 टक्के मुलांनी वेल्डर कोर्स प्रवेशाकरिता विकल्प निवडल्याचे दिसून येत आहे.
वेल्डर हा कोर्स कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येतो त्यामुळे नोकरीची संधी लवकर उपलब्ध होते व स्वतःचा वेल्डींग क्षेत्रात उद्योग -व्यवसाय, रोजगारांची संधी व नोकरीची हमी असल्यामुळे स्थानिकांनी या अभ्यासक्रमाकडे वळावे असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे प्राचार्य अमोल वास्कर – आयटीआय हमिदवाडा
Previous Articleसोलापूर : सव्वालाख जेष्ठ नागरिकांना मोफत हेल्थ कार्डचे वाटप
Next Article म्यानमारमधील आगामी निवडणुका









