सुदर्शन चक्राने भौमासुराच्या राजधानीचे अग्नी, पाणी वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले. तसेच मूर दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले. यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदये, शंखानादाने विदीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उद्ध्वस्त करून टाकले.
पाञ्चजन्याची प्रचंड ध्वनि । मुरदैत्याचे पडतां श्रवणीं । उठिला परिखाजळापासूनि । पंचवदनी महादैत्य।
ज्याचा आश्रय भौमासुरा । समरिं अजिंक अमरां असुरां । तेथ भूचरां पामरां नरां । दळणीं दरारा काय तया । तेणें परिसोनि शंखस्वना । केली प्रचंड गडगर्जना । जल सांडूनि पातला रणा । कुरुनररत्ना तें परिसें । भगवंतांच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता. तो ऐकून पाच डोक्मयाचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला. तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता. तो इतका भयंकर होता की, त्याच्याकडे डोळे वर करून पाहणेसुद्धा कठीण होते. त्याने त्रिशूळ उचलला आणि भगवंतांच्या अंगावर धावला. त्यावेळी असे वाटत होते की, जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्मय गिळून टाकील. त्याने आपला त्रिशूल प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर गर्जना करू लागला. त्याने केलेला प्रचंड आवाज सर्व ब्रह्मांडात घुमू लागला.
त्रिशूळें गरुड भेदे न भेदे । तंव शार्ङ्ग सज्जूनि गोविंदें। दोहीं बाणीं छेदिला मघ्यें । त्रिखण्ड करूनि पाडिला ।
बाणपंचकें पांचां वदनीं । दैत्य विंधिला लीलेंकरूनी ।
तोही क्षोभला आवेशोनी । गदा घेऊनि उठावला ।
मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले. त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले. त्याचबरोबर मूर दैत्याच्या तोंडातसुद्धा भगवंतांनी पुष्कळसे बाण मारले. यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतांवर आपली गदा फेकली. परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने, मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चुरा करून टाकला. आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला. तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली. मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो, त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला. ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसू, वसू, नभस्वान आणि अरुण असे मूर दैत्याचे सात पुत्र होते. आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले. पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून, भौ?मासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णांवर चढाई केली. तेथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर बाण, खड्ग, गदा, शक्ती, ऋष्टी, त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला. भगवंतांची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे तिळतिळ तुकडे केले. भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके, मांडय़ा, हात, पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसदनाला पाठविले. Ad. देवदत्त परुळेकर








