तुमच्या आमच्या सर्वांची गणेश चतुर्थी दिवशीची पहाट नेहमी गणेशभक्ती गीतांनीच झालेली असते. खरेतर कॅसेटच्या (आता सीडीच्या किंवा तेही मागेच पडले.) दुकानात मोठय़ा ठसक्मयात वाजणारी ही गाणी तुम्हाला गणेशोत्सवच काय, सर्वच सणांची सुरेल संगीतमय वर्दी देताना ऐकायला मिळतात. मनाची उत्सुकता वाढवत नेणारी ही गाणी उत्सवाची खरी खरी मजा आणतात ती गणेश चतुर्थीच्या पहाटेला. एकदा का श्रीगणेशाची पहिली षोडशोपचार पूजा आणि आरती पार पडली, की श्रवणीय वाटेल एवढय़ाच आवाजात ती गाणी लावून ठेवली की घरातली सगळी मंडळी पुढच्या कामाला हात घालायला मोकळी! बाप्पापुढे शांत बसून ही गाणी ऐकताना मिळणारा निर्भेळ आनंद अनेकांनी लहानपणी खूप अनुभवला असेल. काय लाजवाब गाणी असायची ती! या सणांच्या निमित्ताने गाण्यांचे किती प्रकार आपल्या कानावर येत असतात! आरत्या असतात, भजने तर भरपूर असतात. या बाबतीत पहिला नंबर लागतो तो बाजारात येणाऱया गणेशगीतांचा. ती वाजायला लागली की ओळखायचे चतुर्थी जवळ आली. आठवणीतली किती गाणी आहेत! अगदी जुने जुने म्हणता ताजे वाटणारे ‘अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती’ हे सुमनताईंच्या स्वरात असलेले गाणे. ‘तुज मागतो मी आता’ हे लतादीदींच्या आवाजातले अनेकदा ऐकलेले गाणे, तसेच त्यांच्याच आवाजातली गणपतीची आरती. केवळ श्रवणानंदाचा अत्यानंद. मग पुढे एक भलामोठा कालखंड पं. अजित कडकडेंच्या आवाजाने व्यापलेला! ‘ह्रदयाच्या तालावर नाचे गणेशु’ ने अक्षरशः मार्केट जे काही खाल्ले होते की अजूनही व्यावसायिक कलाकारांच्या कार्यक्रमात या गाण्याला जागा असतेच. आणि न चुकता ते तसे वाजतेच. त्या अल्बममधील सगळीच गाणी सुपरहिट ठरली होती. मग ते वाजे मृदुंग टाळ विणा असो किंवा गणनायका शुभदायका. विनायका व्हा जागे ईशा असो वा शेवटचं ‘करू नका उपहास, गणरायांची थट्टा करिता मिळे शाप चंद्रास’ हे गाणे असो. तशी अनेक गायकांची गाणी होती. शिंदे कंपनीची गाणीही अशीच फेमस होती. ‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता’ हे गाणे आम जनतेत सर्वोच्च लोकप्रिय! अनेकदा गायक कोण आहे हे न बघताच गाणे मात्र प्रचंड आवडायला लागत असे. उदाहरणार्थ ‘देवा गणेशा तुझी’ ‘टिम टिम टिंबाली’, ‘माझ्या गणानं घुंगरू हरवलं’ ‘लवकर यावे सिद्धगणेशा, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ हे गणगौळणीतले गाणे असो. असंख्य गाणी आहेत. भोळय़ाभाबडय़ा भक्तांच्या मनोकामना दर्शवणारी ही गाणी कायमच लोकप्रिय राहिल्यास नवल ते काय? पण तब्येतदारपणे ऐकणाऱयांसाठी आणि ते गाण्यासाठी धडपड करणाऱयांसाठीही निखळ आनंद देणारी खूप गाणी आहेत.
जुन्यातली पं. वसंतरावांची ‘प्रथम तुला वंदितो’ आणि ‘तू सुखकर्ता’ तसेच ‘गणराज रंगी नाचतो’ किंवा ‘दाता तू गणपति गजानन’ ही गाणी. बसवायला जमलीच तर महदानंद! पण या गणपतीत तयारीला सुरुवात करावी तेव्हा पुढच्या गणपतीपर्यंत तयार व्हायची! अर्थात इतका अभ्यास घडवून घेणारी गाणी बसवताना तालमीचा अपरिमित आनंद तर देतातच, पण ती सादर केल्यानंतर तो आनंद शतगुणित होतो. त्यानंतर असेच एक जबरदस्त गाणे म्हणजे शंकर महादेवन यांनी गायिलेले ‘गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही’ हे गाणे. हे ऐकायलाही पेशन्स लागतो, तयारी लागते. जाता येता ऐकायचे हे गाणे नव्हेच मुळी! ते कानावर आले की श्रोत्यांची बाकीची व्यवधाने आपोआप थांबणार. आणि याची गाण्यासाठी तयारी करायची म्हणजे सुरांइतकीच किंवा थोडी जास्तच तयारी शब्दोच्चारांसाठी हवीच हवी. नाहीतर शक्मय नाही. गाण्यातल्या गणरायाचे हे गायकांसाठीचे ठसठशीत अस्तित्त्व! त्याचे ‘गणनायक’ असणे प्रकर्षाने जाणवून देणारे! ही आणि अशी खूप गाणी असतात. आता वळू भजन या प्रकाराकडे!
कोकणात गणेशोत्सवात दर वाडीवस्तीवर, दर आवाटात रोज चालणारी भजने हा असाच लोकप्रिय गीतप्रकार. पायपेटी घेऊन बसलेले ते भजनीबुवा आणि मग डबलबारी असली तर रात्र रात्र चालणारी ती जुगलबंदी, तास न् तास घुमणारे ते मृदंगाचे घुमारदार बोल, टाळांचा आणि टाळय़ांचा सतत चालणारा खणखणाट आणि कडकडाट याची झिंग काय असते ती त्याची जबर आवड असणाऱयांनाच कळावी! भजनीबुवांच्या जगात पांचाळबुवा म्हटले की अनेकांचे हात आदराने कानांच्या पाळीकडे जातात. असे भजनीबुवा आणि त्यांनी गायिलेली भजने हे गणेशोत्सवाच्या मोदकांइतकेच व्यवच्छेदक लक्षण आहे. बुवा रामदास कासले, बुवा भगवान लोकरे, बुवा विजय परब अशी खूप नावे आहेत. गणपतीच्या दिवसात (खरेतर रात्रीतून) पूर्वी गॅसबत्त्यांच्या आणि आता शक्तिशाली टॉर्चेसच्या त्या उजेडात हलणाऱया माणसांच्या सावल्या पाहताना पायपेटीचे तरंगत येणारे सूर ऐकावेत, टाळांचा आणि टाळकऱयांच्या साथीचा आवाज ऐकत रहावा. एकेका घरातले गणपती बघत बघत हिंडत रहावे. गाण्यातल्या गणपतीचे असेही एक दर्शन असते. क्वचित पडणारी पावसाची सर मातीचा सुवास परतभेटीला आणत असते. वातावरणात दरवळणारे सूर उदबत्तीच्या सुगंधाहूनही गोड भासतात. भजनांनी रात्री चढत राहतात. मृदंगाच्या बोलांनी घुमत राहतात.
गणेश ही देवता अतिशय संगीतप्रिय. शिवाय अग्रपूजेचा मान असणारी देवता. नादभाषेचा हा जाणकार अन् प्रकाशभाषेचाही वापर करणारा देव. याच्या संगीतसेवेला जशी भक्तिगीते आणि भजने असतात तशाच आरत्या आणि मंत्रपुष्पांजली असते. आरत्यांविषयी यापूर्वी दोनवेळा आपण संवाद साधलाच आहे. पण अजून एक दमदार प्रकार म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात बेभानपणे रंगणारे, दंगणारे दणकेबाज ढोल! शहरातून आजकाल ढोलपथकांचा बोलबाला बराच आहे. स्त्रियाही यात अहमहमिकेने भाग घेतात. प्रचंड जड असणारे हे ढोल वाजवण्यासाठी भयंकर ताकद लागते आणि त्यांचे ते विशिष्ट ठेके अतिशय दमदारपणे, तडफदारपणे वाजवण्यासाठी ताकदीबरोबरच संयम आणि लयीची बारीक जाणीवही असावी लागते. महिनो न् महिने ही मुले मेहनत घेत असतात, तेव्हा कुठे आपल्याला हे छप्परतोड ढोल ऐकायला मिळतात. त्याचबरोबर गळय़ात तो वजनदार ढोल घेऊन पेलवायचा, वाजवायचा, आणि त्याचबरोबर अचूक मेळ साधून फेर धरून नाचायचे यासाठी आडमाप बेहोशीच लागते. सर्वांगाची फुले करून बाप्पाच्या चरणी वाहून टाकण्याचा बेछूट आवेश असतो या ढोलकऱयांमध्ये! अंगात प्रचंड रग, हातात प्रचंड ताकद, मनात प्रचंड तुफानी आवेग घेऊन चेव आल्याप्रमाणे वाजवणारी ही तूफानं शेवटच्या टिपरीनंतर आरती करताना इतकी शांत भावुक होतात ना की नजरांची निरांजने होतात नि ओंजळीची फुले!
त्यांच्या चेहऱयावरचे भक्तिभाव बघून कुणीही हेवा करावा. बाप्पा सोंडेतल्या सोंडेत हसत असतात. आपल्या मनात आरत्या, आवर्तने, भजने, मैफिली, ढोल या सगळय़ांचे मिळून एक संगीत कोलाज तयार होत असते. सुरातालातून या संगीतातून बाप्पाच वाहत असतात की बाप्पांच्या अस्तित्त्वाचाच एक अविभाज्य भाग म्हणून हे संगीत वाहत असते हे कोडे मात्र सुटत नाही. कारण त्याचे उत्तर बाप्पांच्याच हाती असते. आपण फक्त सुरात सूर मिसळायचा असतो……
गणपती बाप्पा मो रया!
अपर्णा परांजपे-प्रभु 8208606579








