नवी दिल्ली
गेल्या काही महिन्यात ग्रामीण भागात वर्क फ्रॉम होमच्या भरती संख्येत तिप्पट वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या काळात झालेली ही वाढ समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंपन्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना वर्क फ्रॉम होमची संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्तम लवचिकता तसेच जाण्यायेण्याच्या वेळेत होणारी बचत पाहता वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वर्क फ्रॉम होम करणाऱयांना नियंत्रण मिळवणे सहज जमते आहे. गेल्या काही महिन्यात वर्क फ्रॉमच्या नोकरीकरीता अर्ज करणाऱयांची संख्याही सातपट वाढली असल्याचे समोर आले आहे. यावर्षी कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होमच्या नोकरभरतीत तीनपट वाढ झाली आहे. जॉब पोर्टल नोकरीडॉटकॉमच्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आलीय. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये वर्क फ्रॉम होमच्या नोकरीचा वाटाही चारपट वाढलेला दिसून आलेला आहे. पारंपरिक कार्यालयीन आधारीत नोकरीची पदे जसे की सेल्स/बिझनेस डेव्हलपमेंट आणि कस्टमर केअर एजंटस् यांना वर्क फ्रॉम होम तत्वावर नोकरीची संधी दिली जात आहे. जास्तीत जास्त ग्रामीण भागातून उमेदवार वर्क फ्रॉम होम करण्यासाठी पुढे येत आहेत, असे दिसते. त्यातही बीपीओ/आयटीइएस क्षेत्रासह आयटी सॉफ्टवेअर, एज्युकेशन/टीचिंग आणि इंटरनेट/इ-कॉमर्स यांनीही वर्क फ्रॉम होमकरीता अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.








