प्रतिनिधी/ चिपळूण
ऐन गणेशोत्सवात आठ दिवसांपासून मिरजोळी गावाला पाणी नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी लवकर फुटलेल्या पाईपची दुरूस्ती करून उपलब्ध असलेल्या कमी क्षमतेच्या पंपाने गावाला पाणीपुरवठा करण्यात आला, तर जळलेला दुसरा मोठय़ा क्षमतेचा पंप मंगळवारी बसवला जाणार आहे.
गावातून वाशिष्ठी नदी वाहत असतानाही पाण्याची मोठी गैरसोय होत असून कायम गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तरीही नाईलाजास्तव ग्रामस्थ अशा पाण्याचा वापर करत आहेत. असे असताना आठ दिवसांपूर्वी मोठय़ा क्षमतेचा मुख्य पंप जळला आहे. त्याच्या दुरूस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असून दुसऱया कमी क्षमतेच्या पंपाचा पाईप फुटला होता. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. ऐन गणेशोत्सवात अशी वेळ आल्याने व महिलांना दिवस-रात्र झऱयांचे पाणी भरावे लागत असल्याने महिलांसह ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
मात्र सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण जाधव यांनी मोर्चा काढू नये म्हणून ग्रामसेवक सुभाष माळी यांना तत्काळ कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार माळी यांनी संबंधित कर्मचाऱयांशी संपर्क साधून पंप व पाईपाची दुरूस्ती करण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करून दुपारनंतर टप्प्याटप्प्याने गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तूर्तास आपला मोर्चा रद्द केला आहे.
माळींच्या बदलीसाठी लवकरच उपोषण
पाणीपुरवठा करणाऱया कर्मचाऱयांनी ग्रामसेवक सुभाष माळी यांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी गावात कोठे, काय कामे करायला पाहिजेत याची यादी दिली आहे. तरीही ते लक्ष देत नसल्याचे कर्मचाऱयांकडून ग्रामस्थांना सांगितले जात आहे. तसेच ते कामे करणाऱयांची बिले वेळेत देत नसल्याने कोणीही काम करण्यास येत नाही, त्यांचे ग्रामस्थांशी वागणे चांगले नाही, असे अनेक आरोप ग्रामस्थामधून होत असून त्यांच्या बदलीसाठी लवकरच पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसे पत्र पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, गटविकास अधिकारी सरीता पवार व अन्य प्रशासकीय अधिकाऱयांना देण्यात येणार आहे….









