रायफलसह दिसून आले अध्यक्ष :निदर्शने तीव्र
वृत्तसंस्था/ मिंस्क
बेलारुसची राजधानी मिंस्कमध्ये रविवारी रात्री लाखो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. जनतेच्या निरंतर निदर्शनांमुळे अध्यक्ष लुकाशेंको यांना घाम फुटू लागला आहे. कुठल्याही स्थितीत विरोध चिरडून टाकणार असल्याचे म्हणत लुकाशेंको यांनी निदर्शनांमागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको हे रविवारी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून एके-47 रायफल हातात घेऊन दिसून आले आहेत.
लुकाशेंको सलग 7 व्यांदा अध्यक्ष झाल्यापासून देशात सातत्याने निदर्शने होत आहेत. प्रतिदिन लाखो लोक रस्त्यांवर उतरून लुकाशेंको यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सुमारे 1.5 लाख लोक अध्यक्ष लुकाशेंको यांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये भाग घेत आहेत. 7 हजारांपेक्षा अधिक निदर्शकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
अटकेतील निदर्शकांचा पोलीस छळ करत असल्याचा आरोप होत आहे. निदर्शनांचे स्वरुप पाहता लुकाशेंको यांना 80 टक्के मते मिळाल्याच्या निकालावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे निवडणुकीच्या एका पर्यवेक्षकाने म्हटले आहे.









