गुप्तचर यंत्रणेचा इशारा : स्थानिक गँगस्टरांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ चंदीगढ
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि त्याच्या दहशतवादी संघटनांनी स्थानिक गँगस्टरांशी हातमिळवणी करण्याचा कट रचला आहे. स्थानिक गँगस्टरांच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न आयएसआयने चालविला अहे. चंदीगड इंटेलिजेन्स युनिटने सर्व गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्थानिक कनेक्शनविषयी सतर्क केले आहे.
काही गँगस्टरांची नावेही गुप्तचर यंत्रणेने उघड केली आहेत. यातील काही गँगस्टर फरार असून काही जण तुरुंगात कैद आहेत. आयएसआय पूर्वीपासूनच य गँगस्टरांच्या संपर्कात असू शकते, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱयाने केला आहे.
स्लीपर सेलचे अस्तित्व संपुष्टात
आयएसआयच्या कारवायांचा कणा मानल्या जाणाऱया लोकल स्लीपर सेलला भारतीय यंत्रणांनी जवळपास संपुष्टात आणले आहे. तसेच उर्वरित हस्तकांना सैन्याच्या हातून मारले जाण्याची भीती सतावू लागल्याने त्यांनी कुठल्याही हल्ल्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकल स्लीपर सेलला नियंत्रित करण्यासाठी आता कुठला म्होरक्याही उरला नसल्यानेच दहशतवादी संघटनांनी नवा कट रचल्याचे अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.
5 गँगस्टरांचा समावेश आयएसआय व अन्य दहशतवादी संघटनांनी 5 गँगस्टरांना काही राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याची जबाबदारी सोपविली आहे. यातील 2 सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर 3 गँगस्टर पंजाबच्या विविध तुरुंगांमध्ये कैद आहेत. या गँगस्टरांवर हत्या, दरोडे, अमली पदार्थांची तस्करीचे कित्येक गुन्हे नोंद आहेत. तुरुंगात कैद गँगस्टरांच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेण्याचा निर्देश देण्यात आला आहे.









