सार्वजानिक गणेश मंडळात फक्त कार्यकर्ते
कोरोनामुळे यदां बाप्पाचे दर्शन दूरूनच
प्रतिनिधी / सातारा
सातार्यातील सार्वजानिक गणेश मंडळात बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी गर्दी होत असते. या गर्दीला यंदा कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. मंडळात फक्त कार्यकर्ते असून गणेश भक्त दूरूनच दर्शन घेवून समाधानी होत आहेत.
सातार्यातील सार्वजानिक गणेश मंडळे दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करतात. भव्य मंडप, आकर्षक सजावट, जिंवत देखावे, महाप्रसादाचे आयोजन, होम-हवन करण्यात येते. काही मंडळे सामाजिक उपक्रम राबवितात. फक्त जिल्ह्य़ातून नव्हे तर पुणे-मुंबई येथील चाकरमानी हा उत्सव पाहण्यासाठी सातार्यात येतात. यंदा गणेशोत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागल्याने सर्वत्र शांतता पहायला मिळत आहे. काही सार्वजानिक गणेश मंडळांनी हा उत्सव रद्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर मानाच्या गणपतीचे छोटे मंडप उभारून कार्यकर्त्यांनी गणरायाची प्रतिष्ठाना केली आहे.
गणेशोत्सव सुरू होवून दोन दिवस झाले तरी गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी झालेली नाही. सोशल डिस्टन्सचे पालन करत दूरून दर्शन घेतले जात आहे. मंडळात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. फक्त पाच कार्यकर्ते उपस्थित आहेत. प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात आहे. देखावे रद्द झाल्याने यंदा भक्तांचा उत्साह कमी झालेला पहायला मिळत आहे.









