अटकेतील दहशतवाद्याची कबुली : अबू युसूफच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत अटक करण्यात आलेला इस्लामिक स्टेटचा दहशतवादी मुस्तकीम खान ऊर्फ अबू युसूफ याने चौकशीदरम्यान मोठय़ा घातपाताची कबुली दिली आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीतून अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या जबानीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर तपासाची चक्रेही गतिमान करण्यात आली आहेत. तसेच त्याच्या घराची झडती घेत स्फोटके, जिलेटीन्स व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचेही सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले.
अबू युसूफच्या चौकशीतून दिल्लीत मोठय़ा दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्याच्या टार्गेटवर विशेषतः हिंदू नेतेच असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर बडय़ा नेत्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे. तसेच सरकारी सुरक्षा यंत्रणांनाही दक्ष राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर भारतातील हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे. या दहशतवाद्याच्या निशाण्यावर दिल्लीतील काही प्रति÷ित व्यक्तीही होत्या, असेही वृत्त आहे.
युसूफच्या कुटुंबियांचीही चौकशी
युसूफच्या अटकेनंतर त्याच्या उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील घरातून स्फोटके बनण्याचे साहित्य व शस्त्रे जप्त करण्यात आली. यानंतर सुरक्षा अधिकाऱयांनी त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी युसूफच्या पत्नीने आपण त्यांना स्फोटके बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते माझ्या ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते अशी माहिती दिली. तसेच त्याच्या वडिलांनी आपला मुलगा दहशतवादाच्या मार्गावर जाईल याची कधी मी कल्पनाही केली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. जप्त केलेल्या स्फोटक साहित्यासंबंधी विचारणा केली असता अबूने स्फोटक साहित्याची जमवाजमव केल्याची मला कल्पना असती तर, मी त्याला कधीही माझ्या घरात राहू दिले नसते, असेही ते पुढे म्हणाले.
अफगाणिस्तान कनेक्शन
अबू युसूफ गेल्या कित्येक दिवसांपासून युसूफ-अल-हिंदी ऊर्फ साफी अरमारच्या संपर्कात असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. युसूफ-अल-हिंदी हा इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी आहे. तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने इस्लामिक स्टेटची यंत्रणा चालवत असल्याची माहिती उघड झाली आहे. युसूफ-अल-हिंदीने या कामासाठी अबू युसूफची निवड केली होती.
फरार दहशतवाद्याचा थांगपत्ताच नाही राजधानी दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिराने दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने घातपाती कट उधळून लावला होता. रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी आयएसच्या दहशतवाद्याला अटक केली होती. मात्र घटनास्थळावरून एक दहशतवादी फरार झाला असून त्याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.









