इस्लामाबाद / वृत्तसंस्था
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमधील ‘व्हाईट हाऊस’मध्ये असल्याची कबुली देणाऱया पाकिस्तानने अवघ्या चोवीस तासात आपला शब्द फिरवला आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा फेटाळून लावत प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त निराधार असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. शनिवारीच पाकिस्तानने दाऊदसह, हाफिज सईद याच्यासह अन्य दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने शब्द फिरवल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दाऊदच्या कराचीमधील वास्तव्याच्या माहितीवरून अडचणीत आलेल्या पाकिस्तानने तो पाकिस्तानात राहतच नसल्याचे म्हटले आहे.









